मुंबई: अजय देवगणची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला. पाहता पाहता त्या ट्रेलरने सोशल मिडिया, यु ट्यूब वर वाहवा मिळवली. हा चित्रपट आता हिंदीसोबत आता मराठीतही प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का!’ या डायलॉगने तरुणांना भुरळ घातली आहे.
‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’ असं म्हणणाऱ्या एकनिष्ठ तानाजींची शौर्यगाथा अजय देवगणच्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटातून आता मराठीमध्येही पाहायला मिळणार आहे. याबाबत बोलताना अजय देवगण म्हणतो, ‘तानाजी मालुसरेंसारख्या शूरवीराची कथा हिंदीसोबतच त्यांच्या मातृभाषेत अर्थात मराठीमध्ये प्रेक्षकांसमोर मला आणता येणार आहे हे मी माझं भाग्य समजतो. आमच्या या प्रवासात भारतातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचाही पुढाकार असावा असं मला अगदी मनापासून वाटतं.’
चित्रपट १० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी महाराजांनी आपल्यावर सोपवल्याचं कळताच, मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे सज्ज झाले होते. ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. त्याच्या अतुलनीय पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला होता. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलंय. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा ७० एमएम पडद्यावर पाहणं हा नक्कीच विलक्षण अनुभव असेल.