‘तान्हाजी’ ब्लॉकबस्टर ; तीन दिवसात केली इतकी कमाई !

0

मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगण मुख्यभूमिकेत असलेला बहुचर्चित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित झाला. हा सिनेमा मोठी कमाई करणार हे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. दरम्यान तीन दिवसात तान्हाजीने ६० कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई तान्हाजीने केले होते. चित्रपट अभ्यासक तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार तान्हाजी सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या छपाकला तीन दिवसात 20 कोटींचा गल्ला जमविता आलेला नाही.

तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 15.10 कोटी, दुसऱ्या दिवशी शनिवारी 20.57 कोटी आणि रविवारी 26.08 कोटी असे पहिल्या विकेंडला 61.75 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा हा सिनेमा यंदाच्या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे.

‘तान्हाजी’ हा सिनेमा मराठमोळा दिग्दर्शित ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. अजय देवगणच्या करियरमधील हा शंभरावा सिनेमा आहे. महत्त्वाचं म्हणजे या सिनेमासोबत दीपिका पदुकोणचा छपाक आणि रजनीकांतचा दरबार हे दोन सिनेमेही रिलीज झाले होते. मात्र तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमावर प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटवल्याचं चित्र आहे. छपाक सिनेमाने पहिल्या दिवशी अवघी 4.77 कोटी रुपयांची कमाई केली.