पालिकेला कधीतरी येते जाग : कारवाई नावालाच
पिंपरी-चिंचवड : काळेवाडीतील तापकीर चौक अतिक्रमणात हरवून गेला आहे. याबाबत नागरिकांनी तक्रार केल्यावरच महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी जागे होतात. तसेच कागदपत्रे रंगविण्यापुरती हातगाड्यांवर किरकोळ कारवाई केली जाते. तापकीरनगर आणि थेरगाव वेगवेगळे दोन प्रभाग असल्यामुळे याभागात आठ नगरसेवक आहेत. मात्र, एकाही नगरसेवकाचे या चौकातील अतिक्रमण अथवा वाहतूक कोंडीकडे लक्ष नसते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
बीआरटी म्हणजे वाहनतळच
काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटी रस्त्याचे काम रखडले आहे. काळेवाडी फाटा ते तापकीर चौकात बीआरटी मार्गातील रिकाम्या जागेत बेकायदेशीर वाहनतळ झाले आहे. चौकात फुटपाथवर बेकायदेशीर टपर्या, हातगाड्या लावल्या जात आहेत. त्यामुळे सायंकाळी आणि सकाळी याठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. तर, थेरगावकडे जाणा-या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला बेकायदेशीर वाहने लावली जात आहेत. कंपन्यांमध्ये कामगारांची वाहतूक करणा-या बसेस लावल्या जात असल्यामुळे रात्री याठिकाणी अश्लिल प्रकारही घडत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. अशा प्रकारांमुळे या भागातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे.
केवळ हातगाड्यांवर कारवाई
तापकीरनगर आणि थेरगाव वेगवेगळे दोन प्रभाग असल्यामुळे याभागात आठ नगरसेवक आहेत. मात्र, एकाही नगरसेवकाचे या चौकातील अतिक्रमण अथवा वाहतूक कोंडीकडे लक्ष नसते. त्यामुळे नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. शेवटी पालिकेच्या सारथीवर अनेक सुजान नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याकडेही अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे. तक्रारी वाढू लागल्याने शेवटी अतिक्रमण विरोधी पथकातील अधिका-यांनी तापकीर चौकात कारवाईची बोळवण केली आहे. दहा हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेने कळविली आहे.