नंदुरबार । उन्हाचे चटके जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र, येत्या काही दिवसात गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नंदुरबारातही काहीसे ढगाळ वातावरण आहे. मात्र, जिल्ह्याचे तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून मार्चच्या सुरूवातीलाच हे राज्यातच नव्हे तर देशातील सर्वाधिक तापमान ठरले आहे. याची चौकशी केली असता, ही आकडेवारी चुकीची देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तापमामान मोजण्याची यंत्रणा नसल्याने हा घोळ झाल्याचेही समोर येत आहे. तापमान 38 अंशावरच होते असा खुलासा खुद्द जिल्हाधिकार्यांनी केला आहे.
नागरिकांमध्ये भिती
राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक तापमानाची नोंद नंदुरबार जिल्ह्याची करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हयाचे तापमान 43 अंश सेल्सिअस इतके असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच नंदुरबार जिल्ह्यातील तापमानाने उंची गाठल्याने भविष्यात या जिल्हाचे तापमान किती अंशा पर्यंत जाईल याची भीती आतापासूनच नागरिकांना वाटू लागली आहे.
जिल्हाधिकार्यांची सारवासारव
मार्चमध्येच नंदुरबार जिल्ह्यातील तपमान 43 अंशावर पोहचणे हे भयानक असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. याची चौकशी केली असता ती आकडेवारी चुकीची देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मलिनाथ कलशेट्टी यांनी तातडीने बैठक घेऊन आढावा घेणे सुरू केलं आहे.
यंत्रणा कुठे आहे?
नंदुरबार जिल्ह्यातील हवामान सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य आहे. तेवढेच नव्हे तर सातपुड्याच्या परिसरात अजूनही सकाळी धुके असते, असे असतांना नंदुरबार जिल्हाचे तापमान अचानक 43 अंशापर्यंत कसे गेले हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तापमान मोजण्याची पाहिजे तशी यंत्रणा या ठिकाणी नाही, जी आहे त्यात ही बिघाड असतो मग हे तापमान अचानक वाढले कसे, हा संशोधनाचा प्रश्न आहे. हीच आकडेवारी हवामान खात्याला जिल्हा प्रशासनाने पुरविली आहे. त्यामुळे हा मुद्दा देश पातळीवर पोहचला आहे.
परवाचे तापमान 38 अंशापर्यंत होते. यापुढे मला विचारूनच तापमानची नोंद वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येईल, तापमान यंत्रणा सुरू असून त्याची पाहणी नुकतीच करण्यात आली आहे
– मलिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी