तापमानाचा पारा 39.7 अंश सेल्सिअसवर; उकाड्याने नागरिक हैराण!

0

पिंपरी-चिंचवड : विदर्भ आणि मराठवाड्याबरोबरच राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात या हंगामात पहिल्यांदाच तापमान 40 अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊन पोहोचले आहे. एरवी, एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचते. परंतु यंदा मार्च महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा 40 अंशांवर जाऊन स्थिरावण्याच्या मार्गावर आहे. येत्या काही दिवसात तापमान अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दिवसभर उन्हाने होणारी धगधग आणि असह्य उकाड्याने पिंपरी-चिंचवडकर अक्षरश: हैराण झाले आहेत. शहरातील कमाल तापमानात वाढ होऊन पारा तब्बल 39.7 अंशावर पोहोचला आहे.

जनजीवनावर परिणाम
तापमानात अचानक वाढ झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. दुपारच्या वेळी कडक उन्ह पडत असल्याने सकाळच्या वेळीच कामे आटोपून घेण्यावर नागरिक भर देत आहेत. अगदी अपवाद सोडला तर दुपारी बाहेर पडणे नागरिकांकडून टाळले जात आहे. नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना स्कार्फ, टोपी, सनकोट घालूनच बाहेर पडताना दिसत आहेत. मंगळवारी तापमानाचा पारा 39.7 अंशावर पोहोचला होता. मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा चटका वाढल्याने जिवाची काहिली होऊ लागली आहे. आकाश निरभ्र असल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. सकाळी दहा-साडेदहापासूनच उन्हाची तीव्रता वाढत असून, घामाच्या धारांनी पिंपरी-चिंचवडकर नागरिक हैराण झाले आहेत.

आठवडाभर उन्हाचा चटका!
पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात येत्या आठवड्यात उन्हाचा चटका कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळेच मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. येत्या आठवड्यात कमाल तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होण्याची शक्यता नाही. तापमानाचा पारा 40 अंशांपेक्षाही वर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.