तापमानातील दुष्परिणाम वेळीच ओळखा!

0

रत्नागिरीत राजापूर तालुक्यात प्रचंड तेलशुध्दीकरण कारखाना प्रस्तावित आहे. युरोप व अमेरिकेतील जनतेत अशा कारखान्यांतुन होणारे कार्बन व इतर उत्सर्जन आणि तापमानवाढ व त्यामुळे होणार्‍या अवर्षण, दुष्काळ व इतर आपत्ती यातील संबंधाबाबत जागृती आहे. स्थानिक दुष्परिणामांचा व समस्यांचा विचार तर हवाच, परंतु प्रकल्पकर्ते नेहमी जागतिक पातळीचा व त्या संदर्भातील देशाच्या प्रगतीचा घोषा लावतात. मानवजातीची प्रगती व विकास यांचा वारंवार उल्लेख करून ते मानसिक दबाव टाकतात. याला जनता बळी पडते. आज तापमानवाढीमुळे पृथ्वीवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाबाबत जनतेला हेतुपुरःस्सर अंधारात ठेवले जात आहे. युरोपात व जगभर दरवर्षी वाढत्या उष्णतेच्या लाटा येत आहेत. ‘सध्या अनेक दिवस चालू असलेल्या लाटेत युरोपात अनेक देशांत तापमान 44 से.सी. झाले. या देशांनी हजारो वर्षांत असे काही अनुभवले नव्हते. सोबत बातमी जोडली आहे. ‘विदर्भ, मराठवाड्यात अनेक भागांत महिन्याभरात पाऊस पडलेला नाही. अर्ध्या महाराष्ट्रात व देशाच्या अनेक भागांत अवर्षण किंवा अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडेल अशी स्थिती आहे.पृथ्वीच्या सरासरी तापमानात सन 1750 च्या तुलनेत 2ओसे ची वाढ होऊन, मानवजात वाचवण्यासाठी केलेला ‘पॅरिस करार’ फक्त पुढील 4 ते 5 वर्षांत अयशस्वी ठरणार आहे. याचा अर्थ मानवजात व जीवसृष्टी वाचवायची तर ताबडतोब औद्योगिकरण थांबवले पाहिजे. कार्बनचे उत्सर्जन तात्काळ थांबले पाहिजे व त्याचवेळी जंगल, सागर, नद्या, तलाव इत्यादींतील हरितद्रव्य वाढीस लागले पाहिजे. ‘अशा परिस्थितीत राजापूरच काय परंतु कोठेही रिफायनरीचा प्रकल्प करता येणार नाही.’ पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित होत आजच्या स्थितीत येण्यासाठी सुमारे 390 कोटी वर्षे लागली. शंभर वर्षांपूर्वी सुमारे 20 कोटी जीवजाती अस्तित्वात होत्या. आज तापमानवाढीमुळे रोज काही हजार जीवजातींचे उच्चाटन होत आहे.

प्रकल्प आणणारे याबाबत बोलत नाहीत, त्यांना हे ज्ञान असेल किंवा नसेलही. पण आपल्याला ते असतानाही आपण ते का मांडायचे नाही? मग शिवाजी महाराज व लोकमान्य टिळकांसारख्यांचे नाव का घ्यायचे? ’पॅरिस करार’ सर्व देशांना बंधनकारक आहे. मी येथे फक्त कायद्याच्या दृष्टीने बोलत नाही. ‘कारण रिफायनरीसारखे प्रकल्प आता केले गेले तर कायदा पाळायला किंवा न पाळायला कुणी जिवंतच असणार नाही. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही’.
अ‍ॅड गिरीश राऊत- 9869023127