तापमानात वाढ होताच माठ अन् रसदार फळांचे भाव वधारले

0

भुसावळ। उन्हामुळे तृष्णा भागवण्यासाठी थंडगार पाण्याची मागणी वाढते. यासाठी अनेक जण शीतपेयांचा आधार घेतात. असे असले तरी बहुतांश कुटुंबे कुंभार बांधवांनी पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या मातीच्या माठांचा वापर करतात. यंदा पारंपरिक माठांसोबतच नळ बसवलेल्या राजस्थानी माठांची मागणी वाढली आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा माठांचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत.

आजार टाळण्यासाठी माठाला पसंती
माठांमध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड होत असल्याने त्याचा शरिरावर दुष्परिणाम होत नाही. फ्रिजच्या पाण्याने घशाचे विकार, सर्दी, डोके दुखणे आदी त्रास होतो. यामुळे उन्हाळ्यात फ्रिजऐवजी मातीच्या माठातील थंड पाण्याला पसंती दिली जाते. फ्रिजच्या तुलनेत माठांची अल्प किंमत आणि ग्रामीण भागात आठ ते दहा तास खंडीत होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे फ्रिज उपयोगशून्य ठरतात. यामुळे माठांची मागणी कायम आहे.

80 रुपये ते 200 रुपयांपर्यंत विक्री
शहरातील गवळीवाडा भागात कुंभार व्यवसायीकांनी मातीच्या माठांची, तर तेली मंगल कार्यालय परिसरात राजस्थानी पद्धतीने नळ बसवलेल्या माठ विक्रीची करणारी दुकाने थाटली आहेत. 80 रुपये ते 200 रुपयांपर्यंत विविध आकारांमध्ये लाल, काळ्या रंगाचे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

फळे धुऊनच सेवन करा
तापमान वाढीमुळे द्राक्षे, आंबा, संत्री, कलिंगड, खरबूज आदी फळांची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिकरीत्या गारवा मिळावा यासाठी अनेक जण कृत्रिम शीतपेयांऐवजी रसदार फळांना पसंती देतात. यादृष्टीने शहरात 12 ते 15 रुपये दराने कलिंगड विक्रीची अनेक दुकाने, हातगाडीवरील व्यावसायिक जागोजागी दिसतात. दरम्यान, फळे कितीही स्वच्छ दिसत असली तरी खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुऊन घ्यावीत. फळे रसायनांचा वापर करून पिकवली जातात. त्यांच्यापासून अपाय टाळण्यासाठी ती स्वच्छ धुणे गरजेचे ठरते.