तापमानाने चाळीशी गाठल्यामुळे 30 हजार हेक्टर्सवरील केळी धोक्यात

0

भुसावळ। विभागातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. वाढत्या तापमानासह सातत्याने खंडीत विजपुरवठा आणि अपूर्ण पाणीपुरवठा यामुळे विभागातील यावल, रावेर, मुक्ताईनगर आदी तालुक्यांतील किमान 30 हजार हेक्टरवरील केळी बागा धोक्यात सापडल्या आहेत. आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत.

झाड वाकून घड सटकण्याचे प्रमाण वाढले
नैसर्गिक संकटे, केळीचे अस्थिर दर, मजूरी आणि रासयनिक खतांच्या वाढलेल्या किमती आदी कारणांमुळे केळीची लागवड शेतकर्‍यांना परवडण्यासारखी नाही. मात्र गेल्या चार महिन्यांपासून केळीचे प्रतीक्विंटल दर 1 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याने शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र उन्हाळ्यात पुन्हा केळीवर संकटांची मालिका सुरु झाली आहे. सध्या बाजारात आंब्यांची आवक वाढल्याने केळीची मागणी घटली आहे. त्यातच तापमानाचा पारा 40 अंशांपेक्षा अधिक असल्याने केळीला प्रचंड फटका बसत आहे. उन्हाच्या तापमानामुळे उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असलेली पाने कोरडी पडतात. केळीचे झाड वाकून घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.

खंडित विज पुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय
विभागातील शेतीसाठी केवळ आठ ते नऊ तास विजपुरवठा मिळतो. सध्या तापमान वाढीमुळे विजेची मागणी वाढल्याने वारंवार विजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे केवळ चार ते सहा तास विज मिळते. यामुळे केळीला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता येत नाही. यामुळे केळीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. सध्या केळीचे दर 1 हजार रुपये प्रतीक्विंटल असले तरी शेतकर्‍यांना 100 ते 125 रुपये कमी देवून केळीची कापणी केली जात आहे.

ग्रीन नेटचा आधार
भुसावळ विभागातील काही व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होत असताना शासनाची कोणतीही यंत्रणा व्यापार्‍यांच्या या निर्णयाबद्दल कारवाई करण्यास तयार नसल्याचे चित्र कायम आहे. आंब्यांचे उत्पादन यंदा अधिक असल्याने इतर फळांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. याच कारणाने उत्तर भारतातून केळीची मागणी घटली आहे. सध्या केळी पिलबाग आणि नवती केळीचे दर प्रतिक्विंटल 1 हजार रुपये असले, तरी यापेक्षा 100 ते 125 रुपये कमीे दराने शेतकर्‍यांना दिले जात आहेत. उन्हाळ्यात केळी बागांच्या चहू बाजूंनी ग्रीन नेट लावाव्यात. ग्रीननेटला पर्याय म्हणून कपाशीच्या पर्‍हाट्या किंवा तुरीच्या तुरकाड्यांचा वापर करून ताटी तयार करावी. त्यामुळे केळी बागांमध्ये उष्ण वार्‍यांचा शिरकाव थांबतो. मुबलक पाणीपुरवठा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. उन्हाळ्यात पिकांना खतांची गरज असल्याने शिफारसीनुसार खते द्यावी.