जळगाव। सध्याचे तापमान 45 अंशांपुढे गेल्यामुळे जमिनीच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता पाहता आणखी तीन आठवडे बागायती लागवड करू नये. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यातच बागायती कापसाची लागवड करावी. तीन आठवड्यात लागवड केल्यास लागवड झालेल्या कापसाच्या झाडांवर विपरीत परिणाम होण्याची भीती असल्याची कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
उन्हाची तिव्रता पाहता तीन आठवड्यापर्यंत लागवड करणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मे महिन्यात बागायती कापसाची लागवड केली जाते. बागायती कापसाच्या लागवडीसाठी सध्याचे वाढलेले तापमान धोकादायक आहे. 42 ते 45 अंशांपुढे तापमान गेले आहे. अशा वातावरणात पुरेसे पाणी न मिळाल्यामुळे आणि तापमान जास्त असल्याने मुळांची वाढ होऊ शकत नाही. उन्हामुळे झाडे दगावण्याचाही धोका असतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड केल्यास मृगछायेच्या वातावरणात झाडाचा बचाव होऊ शकतो. तापमानही कमी होण्याची शक्यता असल्याने या काळात पूर्व हंगामी कापूस लागवड योग्य आहे. जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टर कापसाचे सरासरी क्षेत्र आहे. त्यासाठी 18 लाख बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची गरज असते. जिल्ह्यासाठी 25 लाख बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांना मंजुरी मिळाली आहे. आतापर्यंत 4 लाख पाकिटे बाजारपेठेत दाखल झाली आहेत. शेतकर्यांची मागणी असलेल्या विशिष्ट वाणांच्या आवक संदर्भात कृषी विभाग नजर ठेवून आहे.