तापीच्या बंधार्‍यात आवर्तनाचे पोहोचले पाणी

0

भुसावळ:- तापीच्या बंधार्‍यातील पाणी संपल्याने शहरवासीयांना भर उन्हाळ्यात गत पाच दिवसांपासून टंचाईच्या झळा सोसाव्या लागत होत्या तर पाणीप्रश्‍नांसंदर्भात जनआधारने बुधवार, 28 पासून साखळी उपोषणाचा इशाराही दिला होता मात्र त्यापूर्वीच मंगळवारी सायंकाळी तापीच्या बंधार्‍यात पाणी पोहोचल्याने बुधवारपासून शहरात पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गणेश लाड यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला दिली. सर्वप्रथम जामनेर रोडवरील हनुमान नगर तसेच खडका रोडवरील ज्या भागात पाणीपुरवठा झालेला नाही त्या भागात पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले.

भर उन्हाळ्यात जनतेचे हाल
गत पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने नागरीकांना मिळेल तेथून पाणी आणावे लागत होते शिवाय टँकरला मागणी वाढली होती. हतनूर धरणातून शुक्रवारी दुपारी 12 वाजता आतर्वन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी मंगळवारी सायंकाळी तापीच्या बंधार्‍यात पोहोचण्यास सुरुवात झाली. मंगळवारी रात्रीतून पालिकेचा बंधारा काही प्रमाणात भरून बुधवारी सकाळी किंवा दुपारी 11 लाख लीटर्स पाणी ताशी उचलण्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर रॉ वॉटरची पंपींग यंत्रणा सुरू केली जाणार असल्याचे लाड म्हणाले. बंधार्‍यातील जलपातळी जॅकवेलच्या खिडकीवर जात नाही, तोपर्यंत पंपींग यंत्रणा सुरु करता येणार नसल्याचीही माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.