तापीच्या बंधार्‍यामुळे दिलासा ; जलसाठा वाढणार

0
दर्जेदार कामाची अपेक्षा ; यापूर्वी तीनदा वाहिला बंधारा
भुसावळ:- उन्हाळ्यात तापीच्या बंधार्‍यात पाणी टिकून राहण्यासाठी बंधार्‍याची सव्वा फुटाने उंची वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र आतापर्यंत तीनदा बंधारा वाहिल्याने यंदातरी दर्जेदार काम होण्याची अपेक्षा शहरवासी व्यक्त करीत आहेत. येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण होणार असून यामुळे शहरात एप्रिल आणि मे महिन्यात होणार्‍या टंचाईवर प्रभावी मात करता येणार आहे. तापी पात्रातील बंधार्‍यात एक दलघमी क्षमता आहे मात्र या बंधार्‍यातील जलसाठा केवळ 22 दिवस परत असल्याने पालिकेने या बंधार्‍याची उंची वाढविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यामुळे तापी पात्रातील बंधार्‍यात 0.15 जलसाठा वाढणार आहे. यामुळे शहराला 22 दिवसांऐवजी 30 ते 32 दिवस पाणीसाठा टिकवता येणार आहे.
पाच लाखातून बंधार्‍याचे काम
या कामासाठी पालिकेला सुमारे पाच लाख रुपये खर्च येणार आहे. हतनूर धरणातून शहरासाठी आवर्तन सोडल्यानंतर पुढील आवर्तन 35 ते 40 दिवसांनी मिळते. या काळात बंधार्‍यातील जलसाठा संपतो. यामुळे वाढीव सव्वा फुटाचे बांधकाम करून तसेच काही प्रमाणात पाणीकपात करुन बंधार्‍यातील जलसाठा 35 दिवस टिकवता येणार आहे. यामुळे हतनूर धरणातून पूढील आवर्तन मिळण्यापर्यंत शहरात किमान चार ते पाच दिवस होणारी पाणीटंचाई टाळता येणार आहे. शहरातील एक लाख 87 हजार नागरीकांना टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जातो. तीन दिवसाआड प्रत्येक भागाला पाणीपुरवठा होतो. 135 लीटर दरडोई पाणीपुरवठ्याचे प्रमाण गृहीत धरल्यास शहराला दररोज दोन कोटी 53 लाख 55 हजार लीटर शुद्ध पाण्याची तर किमान चार कोटी लीटर रॉ वॉटरची गरज भासते. पालिकेने बंधार्‍याची उंची वाढविल्यास शहरातील पाणीची गरज उन्हाळ्यातही भागवली जाणार आहे. यासह पालिकेने उन्हाळ्यात वारंवार वीजपंप नादुरुस्त होणे व अन्य तांत्रिक समस्यांवरही व्यापक नियोजन केल्याने शहरातील पाणीप्रश्न काही अंशी तरी सुटण्यास मदत होणार आहे.
शहरवासीयांवर पुन्हा टंचाईचे संकट
उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर हतनूर धरणात केवळ 50 टक्के साठा आजमितीस शिल्लक आहे त्यामुळे तापीतील बंधार्‍यात पाणीसाठा उपलब्ध होण्यास काहीशा अडचणी निर्माण होत आहे. नागरीकांना कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरीकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केले आहे.