भुसावळ । मुक्ताईनगर तालुक्यातील तापीतीरी असलेल्या श्रीक्षेत्र मेहूण येथील संत आदीशक्ती मुक्ताई देवस्थान येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही मुक्ताईंचा गुप्तदिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवार 21 रोजी उत्साहात पार पडला. सकाळी आदीशक्ती मुक्ताईच्या मुर्तीस मंगलस्नान, काकडा आरती, हरिपाठ यानंतर तहसिलदार जितेंद्र कुंवर यांच्या हस्ते सपत्नीक संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या मूर्तींचा अभिषेक केला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. विशेष कार्यक्रमात 10 ते 12 वाजेदरम्यान श्री संत मुक्ताई तिरोभूत सोहळ्याचे कीर्तन सुधाकर महाराज मेहूणकर यांचे झाले. कीर्तनात त्यांनी संत मुक्ताई गुप्त होण्याच्या प्रसंगाचे वर्णन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या दिंड्या मुक्ताईनगरीत दाखल झाल्या होत्या. मुक्ताईच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर लांबच लांब रांगा दृष्टीस पडत होत्या, या सर्वाच्या तोंडी केवळ मुक्ताईचा गजर ऐकू येत होते
वैशाख वद्यच्या शेवटच्या आठवड्यात मुक्ताई झाली गुप्त
वैशाख वद्यचा शेवटचा आठवडा असल्यामुळे एकाएकी विजांचा कडकडाट सुरू होवून चारही दिशा कंपायमान होवू लागल्या. आता आकाश कोसळून पडते कि काय अशी भिती वाटू लागली. भयंकर वारा सुटून पृथ्वी थरथर कापू लागली. आकाश काळ्याकुट्ट मेघांनी भरून आले. सगळ्यांचे डोळे घट्ट झाकल्यासारखे झाले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. यावेळी संत निवृत्तीनाथ, पांडुरंग, रूक्मिणी हे सर्व मुक्ताईला सांभाळा, मुक्ताईला सांभाळा असे म्हणू लागले.
संत मुक्ताईचा जयघोष
मंदिर परिसरात आयोजित कीर्तनाला हजारो भाविकांचा जनसमुदाय होता. त्यानंतर संभाजी मोतीराम पाटील आणि पांडूरंग महाजन यांच्याकडून भाविक, दिंड्या, वा
रकरी यांना अन्नदान झाले. सायंकाळी प्रवचन त्यानंतर मुक्ताई मंदिराला दिंडी प्रदक्षिणा, हरिपाठ व रात्री किर्तन झाले. तसेच संस्थानवर सुरु असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण आणि बाल वारकरी संस्कार शिबीराची सांगता करण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेल्या वारकर्यांनी किर्तनाचा आनंद घेत ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताई शरणम् मुक्ताईचा जयघोष केल्याने संपुर्ण परिसर
दणाणून निघाला.
मुक्ताई झाल्या अंर्तध्यान
कोणालाच कोणाची शुध्द राहिलेली नव्हती. अशा परिस्थितीत, कडाडली वीज निरंजनी जेव्हा । मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥ विजांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यावेळी निरंजनस्वरूप आदीशक्ती मुक्ताई एकाएकी अदृश्य झाल्या. सगळीकडे वातावरण शांत झाले. विजेचा कडकडाट शांत झाला. आकाशातील अभ्रे नाहीशी झाली. मात्र त्यानंतरही सर्वत्र त्रिभुवनात एक प्रहरपर्यंत प्रकाश होता. शके 1219 मध्ये वैशाख वद्य दशमीच्या दिवशी महत्नगर येथील तापीतीरावर 17 वर्ष 7 महिने 24 दिवसांच्या असतांना संत मुक्ताई गुप्त झाल्या, असे सुधाकर महाराज मेहूणकर यांनी सांगितले.
सोहळ्यादरम्यान यांची झालीत किर्तने
दिपप्रज्वलन, कलश पूजन व अभिषेकाने सुरुवात झाली. सोहळ्यात एकनाथ महाराज कुर्हा काकोडा हे ज्ञानेश्वरी प्रवक्त होते. सोहळ्यादरम्यान ज्ञानदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, महादेव महाराज, गोपाळ महाराज, नारायण महाराज, गिरीश महाराज, सुरेश महाराज, कौतिक महाराज, निवास महाराज, दामोदर महाराज, तुकाराम महाराज यांची किर्तने झालीत. विशेष कार्यक्रमात सकाळी 10 वाजता संत मुक्ताई गुप्त दिन सोहळ्याचे किर्तन सुधाकर महाराज यांनी केले. तर 22 रोजी सकाळी 11 वाजता मासिक वारी हरिकिर्तन किशोर महाराज यांचे होईल. 23 रोजी सकाळी 9 वाजता काल्याचे किर्तन सारंगधर महाराज यांचे होईल. 26 रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दिंडी पालखी प्रस्थान होणार आहे.