तापीला पूर : वरणगावातील पाणीपुरवठ्यावर परीणाम

0

नगरपालिका प्रशासनाचे नियोजन सुरू : नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन

भुसावळ- तापी नदीला पूर आल्याने वरणगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या नगरपालिकेच्या जॅकवेलमध्ये पुराच्या पाण्यातील गाळाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे गावातील पाणीपुरवठ्यावर विपरीत परीणाम होत असलातरी पालिका प्रशासनाचे कर्मचारी नियोजनावर भर देत आहे तसेच नागरीकांनी पिण्याच्या पाण्याबाबत योग्य अशी काळजी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.

अवेळी पाणीपुरवठ्याबाबत आवाहन
वरणगाव शहराला कठोरा येथील तापी नदीपात्रातून जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा करून सिद्धेश्वर नगर भागातील जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचा पुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसापासून तापी नदीला पुर सुरू असल्याने पुराच्या पाण्यातील गाळाचा जॅकवेलमध्ये अडसर ठरत आह यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर नैसर्गिकरीत्या परीणाम होत असून शहरात गाळमिश्रीत पाणीपुरवठा होण्याची संभावना लक्षात घेवून नगरपालिकेचे कर्मचारी जॅकवेलमधील पाण्यातील गाळाचा निचरा करण्यासाठी परीश्रम घेत आहेत. यामुळे शहरात अवेळी पाणीपुरवठा होणार असल्याची पालिकेने दवंडी दिली असून नागरीकांनी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरीकांनी काळजी घ्यावी
तापी नदीपात्रातून गाळ मिश्रीत पाणीपुरवठा होण्याची संभावना लक्षात घेता शहरातील नागरीकांनी आवश्यक ती काळजी घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केले आहे.

चार गावांचाही पाणीपुरवठा विस्कळीत
तापी नदीपात्रातील जुन्या जॅकवेलद्वारे कठोरा खुर्द, कठोरा बुद्रुक, अंजनसोंडे आणि फुलगाव अशा चार गावांनाही पाणीपुरवठा केला जातो मात्र तापी नदीला आलेल्या पुरामूळे या गावातील पाणीपुरवठाही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या गावातील नागरीकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फें करण्यात आले आहे.