धुळे । तापी नदीपात्रातनू धुळे शहराला पाणीपुरवठा करणार्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. धुळे शहरासाठी पाणीपुरवठा करणार्या पाईपलाईनला शुक्रवारी पुन्हा सोनगीरजवळ गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून केवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे पाणी चोरी करतात म्हणून सोनगीर ग्रामपंचायत पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणार्या मनपाच्या अधिकार्यांनी शुक्रवारी पाणी गळतीची माहिती मिळूनही दुपारी उशिरापर्यंत कुठलीही हालचाल केलेली नव्हती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. धुळे शहराचा पाणी प्रश्न सुटावा म्हणून तापी नदीतून पाणी उचलून ते बाभळेफाटा येथीलजलशुध्दीकरण केंद्रात आणले जाते.
पावसाळ्यात सहा दिवसांनी पाणीपुरवठा
यानंतर ते पाईपलाईनद्वारे धुळे येथील नगावबारी परिसरात असलेल्या पाणी टाकीत सोडले जाते. त्यानंतर हे पाणी देवपूर परिसरात वितरीत होते. भर पावसाळ्यात धुळ्यात तब्बल चार ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यातच तापी पाणी पाईपलाईनला गळती लागल्यास हाच पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसांनंतर केला जातो.त्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दरम्यान सोनगीर गावाजवळ तापी पाईपलाईनला भगदाड पडल्याने लाखो लिटर पाणी वाया जावू लागल्याचे सोनगीरच्या काही जागरुक नागरीकांच्या निर्दशनात आले. नागरिकांनी शहर अभियंत्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांना कळविले. तथपी दुपारी 1 वाजेपर्यंत मनपाचा कुठलाही अधिकारी, कर्मचारी त्या ठिकाणी पोहचला नव्हता.