भुसावळ । पालिकेच्या तापी नदीवरील बंधारा निकृष्ट कामामुळे वाहिल्याची टिका विरोधकांनी उठवल्यानंतर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी विरोधकांनाही तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. पक्का बंधारा बांधू देण्यास मुळात रेल्वे परवानगी देत नाही त्यामुळे यापूर्वीच्या सत्ताधार्यांनी हा बंधारा बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला मात्र भाजपाचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी अल्प खर्चात काम करून शहरवासीयांना उन्हाळ्यात टंचाईची झळ भासू दिली नाही, असे लोणारी यांनी कळवले आहे.
पक्क्या बंधार्यास लागणार 30 कोटी
बंधार्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असल्याने बंधारा कुठल्याही परिस्थितीत टिकू शकत नाही, असे मुख्याधिकारी म्हणाले. तापी नदीपात्रात नव्याने बंधारा बांधावयाचा म्हटल्यास सुमारे 30 कोटी रुपये खर्च येणार आहे तो पालिकेला आजघडीला करणे शक्यदेखील नाही वा तितका वेळही नाही. शहरासाठी अमृत योजना मंजूर असून काही वर्षातच तिचे काम पूर्ण होणार आहे. बंधार्याची दोन फूट जरी उंची वाढवायची म्हटल्यास जुने व नवीन काम मॅच होणार नाही त्यामुळे बंधार्याला काँक्रिट टाकून जॅकेट करावे लागणार आहे. हे काम करावयाचे म्हटल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होवून पुन्हा नागरिकांना टँकरवर विसंबून रहावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनदेखील त्यासाठी परवानगी देणार नाही.
तत्कालीन सत्ताधार्यांच्या काळातही लाखोंचा खर्च पाण्यात
तालुक्यातील भाजपाच्या सत्ताधार्यांवर बंधार्याचे काम निकृष्ट केल्याचा ठपका ठेवला जात असताना मुळात तत्कालीन सत्ताधार्यांच्या काळातही लाखो रुपये खर्च झाल्याची माहिती उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी दिली. त्यांच्या माहितीनुसार सर्वप्रथम 2012 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी 4 लाख 25 हजार रुपये बंधारा कामासाठी खर्च केले तर 2016 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांनी 8 लाख 75 हजार रुपये या बंधार्यासाठी खर्च केले तर विद्यमान लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांनी अवघ्या 2 लाख 14 हजारात बंधार्याचे काम पूर्ण केले.
पालिकेने बांधलेला बंधारा दोन वर्ष टिकल्याने शहरवासीयांना टंचाईची झळ जाणवली नाही. ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. दरवर्षी तापी नदीतील बंधारा वाहून जातो त्यामुळे निकृष्ट काम झाल्याचा प्रश्च नाही. शहरवासीयांना यंदा पाणीटंचाईची झळ जाणवली नाही. कुठेही टँकरने पाणीपुरवठा झाला नाही.
– बी.टी.बाविस्कर, मुख्याधिकारी
शहराचा विकास करावयाचा आहे मात्र काही ठरावीक लोकांना शहरात विकास होत असल्याने पोटदुखीचा आजार जडला आहे. ज्या विषयाला अर्थच नाही, अशा विषयाचे नाहक भांडवल केले जात आहे. गेल्या सात महिन्यात शहरवासीयांना साधी टंचाईची झळही बसू देण्यात आली नाही, असे असताना व पुढील 50 वर्षांचे नियोजन करीत अमृत योजनेला मंजुरी मिळवून आणली असताना त्यावरही टिका होणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
– रमण भोळे, नगराध्यक्ष