तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव खचला

0

अमळनेर । जिल्ह्यातील चोपडा-अमळनेर तालुक्याला जोडणारा तापी नदीवरील जळोद-बुधगाव पुलाच्या दोन्ही बाजूला असणारा रस्त्यावरील भराव खचला आहे. तसेच हा पूल दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपांनी वेढला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा पूल म्हणजे वाहतूक करणार्‍यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या पुलाची निगा राखणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अंकलेश्‍वर ते बर्‍हाणपूर रस्त्याला जोडला जाणार्‍या रस्त्याची अशी दुरावस्था असतांना सां.बा. विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

काटेरी झुडपे रोडवर आल्याने अपघाताची दाट शक्यता
पुलाच्या दोन्ही बाजूला काटेरी बाभळीची झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे लांबून येणारी वाहने दिसत नाहीत. तसेच ही झुडपे वाढून रस्त्यावर आली आहेत. यामुळे मोटारसायकल आणि इतर वाहनचालकांना अडचण निर्माण होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला ही झुडपे तोडायला वेळ नाही. अनेक दिवसांपासून ही झुडपे न तोडल्यामुळे मोठेमोठे झुडपे पुलाच्या दोन्ही बाजूला निर्माण झाले आहे. जळोद बुधगाव पूल – तापीनदीवर चोपडा अमळनेर तालुक्याला जोडणारा हा पुलाचे भूमिपूजन युती शासनाच्या काळात झाले होते. त्यानंतर आघाडी शासनाच्या काळात तो पूर्णत्वास आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचा शुभारंभ झाला होता. मात्र यानंतर पुलाकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तीन तालुक्यांना जोडणारा हा पूल दुरुस्त करावा अशी मागणीही आता परिसरातून होत आहे.

पाच वर्षातच पुलाची बिकट अवस्था
जळोद-बुधगाव पुलाला सुरू होऊन आता फक्त 5 वर्षे झाली आहेत. गेल्या 5 वर्षात पुलाची दुरावस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाविषयी नागरिक शंका उपस्थित करीत आहेत. पुलाजवळ बरेच मोठे मोठे भगदाड पडल्यामुळे वाहन धारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. पुलामुळे अमळनेर, चोपडा आणि शिरपूर अशी तीन तालुके जोडली गेली आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुलावरून वाहतूक वाढल्याने या पुलाची स्थिती खराब होत आहे. या सर्व परिस्थितीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. विभागाकडून या पुलाची काळजी घेतली जात नसल्याचेच यावरून दिसून येत आहे.

पुलाचा भराव खचला
या पुलाच्या जळोद आणि बुधगाव या दोन्ही गावांच्या बाजूला करण्यात आलेल्या मातीचा भराव अनेक ठिकाणी खचला आहे. तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत. यामुळे वाहनचालकाला वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी अपघात घडतात, अनेकदा मोटारसायकल खड्ड्यात पडतात. त्यामुळे हा रस्ता म्हणजे वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.