अमळनेर। चोपडा व अमळनेर तालुक्याला जोडणारा सावखेडा गावाजवळील तापी नदीवर बांधलेल्या पुलाची अवस्था बिकट झाल्याने वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकाकडून होत आहे. अमळनेर आणि चोपडा या तालुक्यांना जोडणारा हा जंपीग पुल परिसरातील आकर्षणाचा विषय आहे. पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक होतांना वापरण्यात आलेल्या स्प्रिंगमुळे पुल हलतो. त्यामुळे अनेक प्रवासी या हलणार्या पुलाचा आनंद घेण्यासाठी आजही थांबतात. सर्वसाधारण पुलाच्या बांधकामाची मुदत 50 वर्ष असते. त्या नंतर पुलाचा वापर थांबवला जातो. मात्र ब्रिटीशकालीन बांधकाम असलेला हा पूल सुस्थित असला तरी मात्र त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी हा पूल सोईचा असल्यामुळे त्याच्यावरून अवजड व प्रवासी वाहनांचा वापर जास्त असतो.
दोन वर्षापासून पुलाची दुरूस्ती नाही
तापी नदीवर जळोद येथे आणि शिरपूर तालुक्यात सुकवद येथे नवीन पूल बांधल्यामुळे या पुलावरील वाहतूक काहीशी कमी झाली आहे. यापूर्वी याच पुलावरून मध्यप्रदेशत जाण्यासाठी वापर होत असे. गेल्या वर्षी या पुलाची 20 मीटर पॅरापीटची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही हालचाल झालेली नाही.
खड्डा चुकवितांना होतात अपघात
असे असले तरी पुलाला मात्र अनेक समस्यांनी ग्रासले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून डांबर निघाल्याने पुलावर उंच सखल भाग तयार झाले आहेत. पुलाच्या जाईंट मधील डांबर देखील निघाले आहे. त्यामुळे मोठे खड्डे तयार झाले असून अनेकदा येथे अपघात होत असतात. मोटारसायकल चालक अचानक खड्डा आल्याने गोंधळून धडपडतात. तर बर्याचवेळा खड्डा चुकवितांना तोल जाऊन अपघात होतो. अमळनेरकडून जातांना पुलाच्या सुरूवातीस काटेरी झुडूपांनी वेढले आहे. त्यामुळे समोरून वाहन येत असल्याचे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. सदरच्या पुलावर आतापर्यंत शेळ्या, मेंढ्या, बैल असे विविध जनावरांचे देखील पाय अडकल्याने जखमी झाले आहेत तर तीन जणांचा त्याठिकाणी अपघात होऊन मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे निंमगव्हाण, धावडे, सावखेडा, मुंगसे, पातोंडा ह्या परिसरातील बैल गाडी व जनावरांचे पालन करणारे शेतकरी वार्गात संतप्त प्रतिक्रिया व निद्रिस्त सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होईल का? अशी शंका परिसरातील शेतकरी व्यक्त करतांना दिसत आहे.
जम्पिंग पुलाची वैशिष्ट्ये
जंपींग पुलाचा इतिहासपुलाच्या बांधकामाचे उद्घाटन 29 जुलै 1958 मध्ये करण्यात आले होते. पुलाला एकूण नऊ गाळे असून एका गाळ्याची लांबी 46.40 मीटर आहे. तापी नदीवरील लांबी 417.60 मीटर आहे. याचे वैशिष्ट्ये म्हणजे यात बांधकाम करताना स्प्रिंग टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुलावरून वाहने जातांना पूल जंप करत असल्याचे जाणवते. म्हणून या पुलाची ’जम्पिंग पूल’ म्हणून परिसरात ओळख आहे.