जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांचा विश्वास ; भुसावळच्या तापी तिरावर पोलीस चौकीचे उद्घाटन
भुसावळ– तीन शहरांना जोडणार्या तापी नदीच्या पुलावरील पोलीस चौकीमुळे गुन्हेगारीला निश्चित आळा बसून गुन्हे उघडकीस येतील, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे व्यक्त केला. तापी नदी पुलावरील जुन्या टोल नाक्याच्या कार्यालयात पोलीस चौकीचया गुरुवारी सायंकाळी झालेल्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कराळे म्हणाले की, राज्य महामार्ग असल्याने सुरत तसेच गुजरातकडे गुन्हेगार पळाल्यास पोलीस चौकीतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनांचा शोध घेता येईल शिवाय महिला विषयक तसेच संपत्तीचे गुन्हे उघडकीस येण्यासाठी चौकी उपयेागी ठरेल.
पाठपुराव्याची अधीक्षकांकडून दखल -आमदार जावळे
गत काही वर्षांपासून या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले होते तसेच अप्रिय घटना घडत असल्याने पोलीस चौकी गरजेची होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपण चौकी सुरू करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी दखल घेतली, असे आमदार हरिभाऊ जावळे म्हणाले. आपल्या निधीतून हायमास्ट लॅम्प लावण्याची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून या रस्त्यावर गतिरोधक उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली.
रॅश ड्रायव्हींगला आळा -नीलोत्पल
प्रास्ताविकात सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या चौकीमुळे गुनहेगारीला आळा बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मद्याच्या नशेत रॅश ड्रायव्हींग करणार्यांना आता निश्चितच आळा बसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, फैजपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक दत्तात्रय निकम, जिल्हा परीषद सदस्य नंदा सपकाळे, पंचायत समितीच्या माजी सदस्य लक्ष्मीबाई मोरे आदींसह नागरीक उपस्थित होते.