तापी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प शेतकऱ्यांना ठरणार लाभदायक

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील

जळगाव – जिल्ह्यातील तापी आणि गिरणा नदीच्या खोऱ्याचा भाग हा कापूस व केळी पिकासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तापी सहकारी सूतगिरणीचा जिनिंग व प्रेसिंग प्रकल्प लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.

 

तापी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळ परिसरात रेल मारुती जिनिंग व प्रेसिंगचे भूमिपूजन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते आज दुपारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान सभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार अनिल पाटील, पंचायत समितीच्या सभापती कल्पना पाटील, उपसभापती सूर्यकांत खैरनार, सूतगिरणी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील, व्हा. चेअरमन प्रभाकर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

 

गृहमंत्री श्री. वळसे- पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची संस्था सचोटी व प्रामाणिकपणे चालली आहे. शेतकरी हिताची कामे होत असल्याने सहकारी संस्था प्रगती साधत आहेत. तापी सूतगिरणीचे चेअरमन माजी आ. कैलास पाटील यांचे नेतृत्वाखाली हा प्रकल्प चांगली प्रगती साधत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

चेअरमन श्री. पाटील म्हणाले की, चोपडा तालुक्यात सूतगिरणी सुरू झाल्यानंतर तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सुमारे शंभर कोटींचा हा प्रकल्प सभासद शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभदायी ठरावा म्हणून जिनिंग- प्रेसिंग सुरू केली जाणार आहे. त्यासाठी चार कोटी रुपये खर्चून यंत्रसामग्री उभारली जाणार आहे. एकूण खर्च किमान 15 कोटी रुपये येणार आहे. राधेश्याम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय बोरसे यांनी आभार मानले.

 

यावेळी ॲड. संदीप पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, मनीष जैन, ॲड. घनःश्याम पाटील, नीता पाटील, चोपडा साखर कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे, व्हा. चेअरमन शशिकांत देवरे, शेतकी संघाचे अध्यक्ष दुर्गादास पाटील, चोपडा नगरपरिषदेतील गटनेते जीवन चौधरी, उद्योजक आशिष गुजराथी, विजयाताई पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, सूतगिरणीचे संचालक, शेतकरी, सभासद उपस्थित होते.