ताप्ती क्लबमधील ‘त्या’ खड्ड्याचा प्रशासनाकडून पंचनामा

0
भुसावळ:- रेल्वेच्या ताप्ती क्लबमध्ये खेळताना आरसीसी बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या पावणेदोन वर्षीच ओजसचा शनिवारी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेत संबंधिताने खड्डे खोदून त्यावर झाकण ठेवणे गरजेचे असताना तसे न केल्याने बेफिकीरीदेखील उघड झाल्याने समाजमनातून टिका होत होती. सोमवारी या घटनेप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर पाकळे, लिपिक भगवान शिरसाठ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. प्रसंगी खड्डा नऊ फूट खोल असल्याचे व त्यात पावणेतीन फूट पाणी साचल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी दोषींवर कारवाई होण्याचे संकेत आहेत.
रेल्वे अधिकार्‍यांना निनावी पत्र ?
दरम्यान तीन महिन्यांपूर्वी डीआरएम कार्यालयाचे प्रवेशद्वार अंगावर पडून एका बालकाचा मृत्यू झाला होता तर दोन दिवसांपूर्वीच ओजस चिंचकर या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर इंजिनिअरींग विभागातील डीईएन तोमर व एएसई प्रसाद यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पत्र पाठवल्याची माहिती आहे. या दोघा घटनेप्रकरणी आपणाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये? अशी विचारणाही त्यात करण्यात आली आहे.