तामिळनाडूत राजकीय पेच; पन्नीरसेल्वम यांचा बंडाचा पवित्रा

0

चेन्नई : खजिनदारपदावरून गच्छंती केल्याने एमआयडीएमकेचे नेते ओ पन्नीरसेल्वम संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा परत घेऊन आपण विधानसभेत बहुमत सिध्द करू, असे म्हणत त्यांनी शशिकला यांना आव्हान दिले आहे. दरम्यान जयललिता यांच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले असून समिती नेमण्यात आल्याचेही पन्नीरसेल्वम यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. पन्नीरसेल्वम सध्या तामिळनाडूचे हंगामी मुख्यमंत्री आहेत. पन्नीरसेल्वम यांना शह देण्यासाठी शशिकला यांनीही सर्व पावले उचलली आहेत. या गद्दारीची शिक्षा त्यांना मिळणारच, म्हणत शशिकला यांनी इशारावजा धमकीच त्यांना दिली आहे. आपल्या बाजूने १३० आमदार असल्याचा दावा शशिकला यांच्याकडून केला जात आहे. मात्र पक्षपातळीवर पन्नीरसेल्वम यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. एमआडीएमकेमधील या वादळामुळे तामिळनाडूचे राजकीय वातावरण सध्या तापले आहे.

शशिकलांचा बहुमताचा दावा

आपल्याला १३० आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा शशिकला यांनी केला आहे. सध्या सर्वांचेच लक्ष शशिकला यांच्याकडे असून मुंबईतहून राज्यपाल तामिळनाडूत पोहचताच त्यांची भेट घेऊन त्या सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात. दरम्यान, मंगळवारी पन्नीरसेल्वम यांनी पत्रकार परिषद घेऊन तामीळनाडूत राजकीय भूकंप केला होता. पत्रकार परिषदेत पन्नीरसेल्वम यांनी सांगीतले की, जयललिता यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जयललितांचा मृत्यू संशयास्पद असल्याचेच त्यांनी सुचित करून शशिकला यांच्याकडे बोट दाखविण्याचा किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे पन्नीरसेल्वम यांनी, माझे मुख्यमंत्रीपद जबरदस्तीने काढून घेण्यात आले. तसेच अपमानास्पद वागणूक देण्यात आली, असा आरोप केला आहे. पन्नीरसेल्वम जयललिता यांच्या समाधीवर गेले आणि तेथून परतल्यावर त्यांनी शशिकला यांच्या विरोधात त्यांनी बंड केले. यापुर्वी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत पन्नीरसेल्वम यांनीच शशिकला यांच्यासाठी महासचिव आणि नंतर मुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव दिला होता. परंतू मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा परत घेण्याचा पवित्रा आता त्यांनी घेतला आहे.

जयललितांना भेटू दिले नाही

पन्नीरसेल्वम यांनी बुधवारी पत्रकारांना माहिती देताना सांगीतले की, ७५ दिवस जयललिता रूग्णालयात असताना त्यांना मला भेटू दिले नाही. मी दोनवेळा जयललिता यांच्यामुळेच मुख्यमंत्री होता. त्यांच्याशी मी नेहमी प्रमाणिक राहिलो. दरम्यान राजकीय तज्ज्ञांच्या मते १३० आमदारांचा पाठींबा असल्याचा दावा भलेही शशिकला करत असतील, परंतू ओ पन्नीरसेल्वम यांच्याबाजून पक्ष आहे. एमआयएडीएमकेचे एकुण १४०० जनरल कौन्सिल मेंबर्स आहेत. त्यापैकी बहुतांश पन्नीरसेल्वम यांच्याबाजूने आहेत. राजगोपाल यांच्या म्हणण्यानुसार पक्षाचे दोन तुकडे देखील होऊ शकतात. पन्नीरसेल्वम यांना तोंड देणे शशिकला यांच्यासाठी सोपे नाही.

दीपा यांचे समर्थन घेऊ

पन्नीरसेल्वम राज्यपालांची भेट घेऊन थोडा वेळ घेऊ शकतात. शशिकला यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण सध्या प्रलंबित आहे. जर याचा निकाल शशिकलांच्या विरोधात गेला तर मिळालेले मुख्यमंत्रीपदही त्यांना गमवावे लागेल. पन्नीरसेल्वम देखील या निकालाचीच वाट पहात आहेत. हंगामी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीला आपणच जबाबदार आहोत. जर जयललिता यांची भाची दीपा माधवन यांनी जरी समर्थन दिले तर आम्ही त्याचा स्विकार करू.