तामिळनाडू मध्ये आयकर विभागाचे १०० ठिकाणांवर छापे

0

चेन्नई : तामिळनाडू मधील अवैध खाणकाम प्रकरणातील आरोपी ए वईकुंदराजनची कंपनी व्ही व्ही मिनरल्सवर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. त्यासोबतच राज्यातील वईकुंदराजनच्या १०० वेगवेगळ्या ठिकाणांवरही तपास सुरु आहे. वईकुंदराजनवर मोठ्या प्रमाणावर अवैध खाणकामाचा आरोप असून त्याची कंपनी व्ही व्ही मिनरल्स गार्नेट, इल्मेनाइट आणि रुटाइल सारख्या दुर्मीळ खनिजांचा देशातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

वईकुंदराजन हा अब्जाधीश असला तरी त्याचे राहणीमान अत्यंत साधे असल्याचे सांगितलं जातं. पांढरा शर्ट, धोतर आणि बहुतांशवेळा तो अनवाणीच असतो, असेही सांगितले जाते. देशातील खनिज बीच मिनरल्समधील एकूण ६४ परवान्यांपैकी ४५ परवाने वुईकुंदराजन कुटुंबीयांकडे आहेत. यातील बहुतांश त्याच्या भावाकडे असून वईकुंदराजनविरोधात २०० फौजदारी खटले आणि किमान १५० दिवाणी खटले सुरु आहेत.