तामीळनाडूचा शाम क गटात अजिंक्य

0

मुंबई । अकराव्या मुंबई महापौर चषक एल.आय.सी.पुरस्कृत फिडे खुल्या बुध्दिबळ स्पर्धेमधील इलो 1600 गुणाखालील क गट बुध्दिबळ स्पर्धेचे विजेतेपद बाराव्या मानांकित तामिळनाडूच्या शाम आर. (इलो 1548) याने पटकाविले. साखळी शेवटच्या दहाव्या फेरीत पहिल्या पटावर अपराजित शाम आर.ने तामीळनाडूच्याच सतीश कुमार जी. (इलो 1398) विरुद्ध लढतीत विजयाची संधी असतानाही बरोबरीचा प्रस्ताव मान्य केला आणि शामने सर्वाधिक 9.5 गुणांची कमाई करत महापौर चषक व 1,51,000 रुपयांचा पुरस्कार जिंकला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांक श्रीलंकेच्या सिवाथानुजन एस.ने (8.5 गुण) तर तृतीय क्रमांक तामीळनाडूच्या सतीशकुमार जी.ने (8.5 गुण) मिळविला.

व्हीनस चेस अकॅडमीतर्फे मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटना आयोजित क गट बुध्दिबळ स्पर्ध्येच्या निर्णायक दहाव्या फेरीमधील तिसर्‍या पटावर महाराष्ट्राच्या प्रिन्स जयस्वालने श्रीलंकेच्या सिवाथानुजन एस.च्या (इलो 1515) 13 व्या चालीतील चुकीचा लाभ उठवून डावावर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. परंतु 32 व्या चालीनंतर बाजी उलटवण्यात सिवाथानुजनला यश लाभले आणि 52 व्या चालीला सिवाथानुजनने प्रतिस्पर्ध्याच्या राजावर मात करून द्वितीय स्थानावर झेप घेतली. दुसर्‍या पटावर मध्य प्रदेशच्या शेख जहानने हरियानाच्या अभिनंदन मोहनचा सहज पराभव करून 8.5 गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. पाचव्या पटावर गोपीकृष्णन एस.ने आंध्र प्रदेशच्या मधुसूदन रेड्डीवर विजय नोंदवीत 8.5 गुणांसह चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी भरत सिंग चौहान, मुंबई उपनगर जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी विठ्ठल माधव व संयोजक रवींद्र डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.