मुंबई (विशाल मोरेकर) । द्रविडी अस्मितेचा नारा देऊन सी.एन. अण्णादुराई यांनी द्रविड मुनेत्र कझागम (डीएमके) या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली. खरंतर हा पक्ष म्हणजे 1944 पर्यंत जस्टिज पार्टी या नावाने ओळखल्या जाणार्या द्रविड कझागममधून बाहेर पडलेल्या लोकांचा होता. त्यामुळे तामीळनाडूच्या कुठल्याही निवडणुकीत देशात वरचढ असलेल्या काँग्रेसपेक्षा डिएमकेला जास्त जागा मिळत होत्या.
पुढे या फुटीचा फटका डीएमकेलाही मिळाला. फुटीतून उभ्या राहिलेल्या ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझागमने (एआयएडीएमके) डीएमकेला तामिळनाडूमध्ये पहिले आव्हान दिले. एआयडीएमकेकेचे संस्थापक मरुदुर गोपालन रामचंद्रन (एमजीआर) यांच्यानंतर पक्षाचे एकहाती नेतृत्व करणार्या जयललिता यांना तामीळनाडूच्या राजकारणात खूपवेळा पुरुषी अहंकाराला सामोरे जावे लागले. त्यात स्वपक्षीयांकडूनही मिळालेल्या वागणुकीचा समावेश आहे. 1987 साली जयललीता यांना बंदुकीचा धाक दाखवून एमजीआर यांच्या अंत्ययात्रेतून बाहेर काढले होते.
तामीळनाडूमध्ये मतदारांनी एआयएडीएमके किंवा डीएमके यांना पसंतीची मते दिली आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीचा अपवाद वगळता या दोन्ही पक्शांनी आलटूनपालटून राज्यात सत्ता सांभाळली होती. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण दोन्ही पक्ष करत आलेले आहेत.
मार्च 1989 मध्ये तामीळनाडूच्या विधानसभेत घडलेले साडीखेच प्रकरण जयललीता यांच्या राजकीय वाटचालीतली सर्वात वाईट घटना होती. विधानसभेच्या कामकाजादरम्यान जयललिता यांनी तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांना उद्देशून तामीळमधील कुत्रावेली (गुंड) असा शब्द वापरला. त्यानंतर सुरू झालेल्या गोंधळात जयललिता यांच्यावर शारीरिक हल्ला करण्यात आला. त्यावेळी काही सदस्यांनी त्यांचा बचाव केला. त्यानंतर करुणानिधी यांच्या मंत्रिमंडळातील दुराई मुरूगन या मंत्र्याने सभागृह सोडून बाहेर चाललेल्या जयललिता यांच्यावर पुन्हा हल्ला करत त्यांची साडी फेडण्याचा किळसवाणा प्रयत्न केला.
या अपमान नाट्यातून त्यावेळी 40 वर्षांच्या असलेल्या जयललिता यांनी स्वत:चा द्रोपदी असा उल्लेख करत तामीळनाडूत मोठे वादळ निर्माण केले. दोन वषार्ंनंतर त्यांनी तामीळनाडूत सत्ताबदल घडवून आणला. पण अपमानाचे वादळ इथेच शमले नव्हते. या वादळाचा पुढचा अध्याय स्वत: जयललिता यांनी लिहिला.
तामीळनाडूच्या सत्तेत आल्यावर जयललिता यांनी 10 जुलैच्या मध्यरात्री माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी आणि त्यांचे पुत्र एम.के.स्टॅलिन यांना अटक केली. रात्री 1.30 वाजता या दोघांना जेलमध्ये पाठवून जयललिता यांनी सूड घेतल्याची चर्चा होती. या दोघांवर 10 फ्लायओव्हर बांधण्याच्या कंत्राटात 12 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या दोघांच्या अटकेला विरोध केला म्हणून केंद्रात मंत्री असलेल्या मुरसोली मारन आणि टी.आर.बालू यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या अटकनाट्याच्या महिनाभर आधी जयललिता यांनी सत्तेवर आल्यास डीएमकेचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांना जेलमध्ये पाठवू असे विधान केले होते. सत्तेवर आल्यावर त्यांनी ते करुन दाखवले.
जयललिता यांच्या मृत्यूनंतर विशेषत: शशिकलाच्या विरोधात न्यायालयाचा निर्णय आल्यावर माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे तामीळनाडूचे राजकारण कुठल्या दिशेने जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. पनीरसेल्वम यांना केंद्रातून पाठबळ मिळेल असे बोलले जात होते. पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पनीरसेल्वम यांच्याऐवजी पलानीसामी यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करून तामीळनाडूच्या राजकारणात वेगळी खेळी खेळली. त्यात शनिवारी पलानीसामी यांनी सभागृहात बहुमत सिद्ध केल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी पनीरसेल्वम यांना एकटे पाडल्याची चर्चा आहे. करुणानिधी रुग्णालयात आहेत. जयललिता यांच्या मृत्यूनंतर डीएमकेकडून काही अनपेक्षित खेळींची अपेक्षा होती. पण तसे काहीच पाहायला मिळाले नाही. पण शशिकला जेलमध्ये राहून काय चाली खेळतात, पनिरसेल्वम यांची सुप्त इच्छा, तामीळनाडूत बस्तान ठोकण्यासाठी एका पायावर तयार असलेला भाजप या सगळ्यांमध्ये तामीळनाडूतील अस्मितेचे राजकारण कुठल्या टोकाला जाईल, हे येत्या काळात बघायला मिळेल.