ताम्हाणे, करंबे गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारे

0

म्हसळा । तालुक्यातील एक दुर्गम, डोंगराळ भागातील कोलवट ग्रामपंचायतमधील ताम्हाणे करंबे व गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून ग्रामपंचायतीच्या साहाय्याने गावानजीक जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून 25 मीटरचे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे बांधल्यामुळे पावसाचे वाया जाणारे हजारो लीटर पाणी भूगर्भात जीरणार आहे व या बंधार्‍यात साठलेले पाणी वन्यजीवांना व गुरांना पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वनराई बंधारे उपयुक्त ठरणार आहेत. पाणी साठविण्यासाठी कमी खर्चात व कमी वेळेत बंधारे बांधल्याने ग्रामस्थांचा व शासनाचा आर्थिक भार यामुळे
कमी झाला आहे.

अशा प्रकारचे वनराई बंधारे ताम्हाणे करंबे येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधून म्हसळा तालुक्यालाच नव्हे, तर संपूर्ण रायगड जिल्ह्याला एक आदर्श संदेश दिला आहे. असे कोळवट ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच राजाराम तिलटकर यांनी बोलताना सांगितले. हे वनराई बंधारे बांधण्यासाठी सरपंच राजाराम तिलटकर, ग्रामसेवक योगेश पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. या भागात मुळातच पाऊस कमी पडतो आणि पडणारा पाऊस थोड्या दिवसात पडून जातो. त्यामुळे जवळ जवळ वर्षभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी ग्रामीण भागातील जनतेवर विशेषतः महिलांवर येते.

अनेक ठिकाणी बांधण्यास सुरुवात
कित्येक वेळा टँकरने पाणी आणून ते गावातल्या विहरीत ओतावे लागते आणि असे ओतलेले पाणी मिळवण्यासाठीही स्त्रियांची तारांबळ होते. पिण्याच्या पाण्याची ही अवस्था तर शेतीची परिस्थिती फारच अवघड आहे. महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या वा अंतिमतः घेता येणार्‍या सर्व मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणारी, नागरी भागालागातची व खात्रीशीर पाऊसमान असणारी अशी गावे वगळली तरी भविष्यामध्येसुद्धा बरीचशी गावे कोरडवाहू राहणार आहेत. त्यामुळे अशा प्रकाराचे वनराई बंधारे अनेक ठिकाणी बांधण्यास सुरुवातही झाली असल्याचे ग्रामसेवक योगेश पाटील यांनी सांगितले.