मनोर । तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाजवळील भेंडवड या गावात लावलेल्या सापळ्यात गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वावावरणारा बिबट्या पकडण्यात वन विभाग आणि गावकर्यांना अखेर यश आले. पालघर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत बिबट्या सापडण्याचा हा तिसरा- चौथा प्रसंग असून, नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या परिसरात बिबट्या दिसल्याच्या अनेकदा घटना घडल्या होत्या. तारापूरजवळील भेंडवड गावातील रजनीकांत पाटील यांच्या वाडीमध्ये व परिसरात गेल्या चार महिन्यांपासून बिबट्याने पाळीव कुत्र्यांसह अनेक कोंबड्या मारल्या होत्या. त्यामुळे काही दिवसांपासून पाटील यांच्या वाडीमध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता.
7 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या रजनीकांत पाटील यांच्या वाडीतील गोठ्यात बांधलेले वासरू पकडून खात असल्याचे पाहिले. मात्र चाहूल लागताच तो बिबट्या पळून गेला. पाटील यांनी त्यांच्या वाडीमध्येच काम करणारे यशवंत तांबडा व त्यांची पत्नी रेखा तांबडा यांच्या मदतीने मृत वासरू पिंजर्यात टाकले. काही वेळेत आपले शिकार खाण्यास बिबट्या पुन्हा आला आणि वन विभागाच्या सापळ्यात अलगत अडकला. बिबट्या पिंजर्यात अडकताच घटनास्थळी वनविभागाच्या बोईसर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.जे. बुरसे, तारापूर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभारे, वनपरिमंडळ अधिकारी राजेंद्र जाधव, वनपाल ए. व्ही. सारम, डी. एस. मुसळे, तर वाईल्ड लाईव्ह कन्झर्वेशन अँड एनिमल वेल्फेअर असोसिएशनचे हार्दिक सोनी, एरिफ ताडवाला प्रतीक वाहूरवाघ इत्यादींनी सर्वांच्या मदतीने पिंजरा चिकूच्या वाडीतून ट्रक मध्ये पहाटे 2.30-3 वाजल्याच्या सुमारास चढवून डहाणू येथे बिबट्या हलवण्यात आले.
बिबट्यांचा सुळसुळाट
वन विभागाच्या मुंबई (बोरिवली) येथील पथकाने डहाणू येथे जाऊन बिबट्याची पाहणी आणि तपासणी केली. बोईसर शहरात भरवस्तीमधून बिबट्याने मुसंडी पावसाळ्यात मारल्याची घटना घडल्यानंतर डहाणू अशागड परिसरात बिबट्या ऐका फासामध्ये अडकला होता. गेल्या पंधरवड्यात तलासरी येथे राष्ट्रीय महामार्गावर जखमी अवस्थेमध्ये बिबट्या सापडल्यानंतर बोईसर येथे बिबट्या सापळ्यात अडकल्याने या भागातील नागरिकांनी तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्रातील कर्मचार्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.