किडनी रोपण प्रक्रियेत डॉक्टर विद्या संतोष कदम, डॉ. अजय कनबोत, अमित भट्टू यांचा महत्त्वपूर्ण सहभाग, अवयव दानाविषयी जनजागृतीची गरज
ठाणे । शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर अवयव दान करा. मृत्यूपश्चात एक देह अनेक जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुवर्ष प्रतिक्षेत आहेत. मात्र कर्जतमधील ताराबाई श्रावण पवार याला अपवाद ठरल्या आहेत. गावात भरणार्या आठवडा बाजारात रस्त्यावर दुकान लावणार्या ताराबाई पवार या सर्वसामान्य महिलेने या जगाचा निरोप घेताना ‘अनमोल’ अवयवदान केले. डोळे, हृदय, लिव्हर, किडनी दान करत त्यांनी चार रुग्णांना जीवनदान आणि दोन रुग्णांना दृष्टिदान दिले. त्यापैकी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ताराबाई पवार यांची किडनी ठाण्यातीलच प्रशांत तारी या रुग्णास रोपण करण्यात आली. या किडनी रोपण प्रक्रियेत ज्युपिटर हॉस्पिटलच्या प्रसिद्ध डॉक्टर विद्या संतोष कदम, डॉ. अजय कनबोत, अमित भट्टू यांनी सहभाग घेतला. कशेळे गावात श्रावण पवार हे कुटुंबीयासमवेत राहतात. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी त्यांची पत्नी ताराबाई या कशेळे येथील आठवडा बाजार असला, की रस्त्यावर दुकान मांडायच्या. २६ ऑगस्ट रोजी ताराबाई यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना पनवेल एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर २ सप्टेंबर रोजी त्यांच्या डोक्यात मेंदूमध्ये रक्तपुरवठा खंडित झाल्याने मुंबईमध्ये जे. जे. रुग्णालयात हलवले. त्याआधी ताराबाई यांनी आपले पती आणि भाऊ अंकुश मोहिते, मुलगा गणेशच्या संमतीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. वैद्यकीय आणि तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन हे या अवयवदान प्रक्रियेची स्वतः चौकशी करून माहिती घेत होते. पाच वेगवेगळ्या अवयवांचे यशस्वी रोपण ५ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर महाजन यांनी सर जे. जे. रुग्णालयात येऊन मृत ताराबाई पवार यांच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
अवयवदानाची संख्या बोटावर मोजण्याइतपत!
राज्य सरकार भित्तीपत्रके, अवयवदात्यांच्या नातेवाइकांचा सत्कार, सार्वजनिक ठिकाणांवर जाहिराती यांसारखे उपक्रम राबवून समाजात अवयवदानाबाबत जागृती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. परिणामी, खासगी रुग्णालयात अवयवदान व प्रत्यारोपणाच्या प्रमाणात वाढ होत असली, तरी सरकारी व पालिका रुग्णालयात अपुर्या व्यवस्थेमुळे अवयवदानाची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.
ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार पडली किडनी रोपण प्रक्रिया
ठाण्यातील प्रशांत तारी यांना किडनीची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांच्या आईनेही किडनी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची व त्यांच्या आईच्या किडनीमध्ये साम्य नसल्यामुळे ही प्रक्रिया करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी दोन वर्षांपूर्वी जे.जे.रुग्णालयात किडनीसंदर्भात नोंदणी प्रक्रिया केली होती. अखेर त्यांना ताराबाई पवार यांची किडनी देण्याचा निर्णय जे.जे. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. त्यानंतर सर्व प्रशासकीय बाबी पार पाडल्यानंतर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ताराबाई यांची किडनी प्रशांत तारी या रुग्णास रोपण करण्यात आली. या किडनी रोपण प्रक्रियेत ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉ. विद्या संतोष कदम, डॉ. अजय कनबोत, अमित भट्टू यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. या डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर किडनी रोपण करत ही प्रक्रिया पार पाडली. तारी हा डॉ. विद्या कदम यांच्याकडेच ठाण्यातील खोपट परिसरातील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये डायलेसिस घेण्यासाठी येत होता.
नातेवाईकांची परवानगी आवश्यक
एखाद्या पेशंटच्या मेंदूला मार लागला किंवा मेंदूला अन्य काही कारणांमुळे इजा झाली, तर तो पेशंट ब्रेनडेड झाला, हे संपूर्णपणे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ठरवते. यामध्ये सरकारने मान्यता दिलेल्या चार डॉक्टरांची टीम असते. ब्रेनडेड घोषित करण्यासापूर्वी सहा तासांत दोन वेळा अशा पेशंटची तपासणी केली जाते. मगच पेशंट ब्रेनडेड झाल्याचे नातेवाइकांना सांगितले जाते.
पेशंट ब्रेनडेड झाल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. ब्रेनडेड पेशंट म्हणजे मेंदू मृत होतो पण हृदय, किडनी, लिव्हर अशा अवयवांचे कार्य सुरूच असते. या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. अर्थात त्यासाठी नातेवाइकांची परवानगी घ्यावी लागते, अशी माहिती ज्युपिटर तसेच लाइफलाइन हॉस्पिटलच्या डॉक्टर विद्या संतोष कदम यांनी यावेळी दिली.
सर्व वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान समिती स्थापन
सर्व वैद्यकीय महाविद्यालयात देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागात देहदान इच्छापत्राचा छापील नमुना उपलब्ध आहे. तो भरून या विभागात सादर करता येतो. इच्छापत्र भरून दिल्यावर या विभागाद्वारे नोंदणीपत्र व क्रमांक, संबंधित डॉक्टर्सचे टेलीफोन नंबर, आयबँक आदीची माहितीही दिली जाते, अशी माहिती लाइफलाइन तसेच ज्युपिटर हॉस्पिटलच्या प्रसिद्ध डॉक्टर विद्या संतोष कदम यांनी दिली. अवयवदानासाठी सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अशा तज्ज्ञ संघाची आवश्यकता असते. पालिका रुग्णालयात याचा अभाव असल्याने अवयवदानाचे प्रमाण कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
पाच रुग्णांना अवयवदान
जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असताना ४ सप्टेंबर रोजी ताराबाई पवार यांचे निधन झाले. ५ सप्टेंबर रोजी ब्रेनडेड रुग्ण ताराबाई यांच्यावर अवयवदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यानंतर अवयवदात्या ताराबाई यांचे हृदय याच फोर्टिस रुग्णालयातील रुग्णास रोपण करण्यात आले. त्यांचे लिव्हर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या शरीरात रोपण करण्यात आले, तर त्यांची एक किडनी ज्युपिटर रुग्णालयातील एका रुग्णास आणि दुसरी किडनी तसेच दोन डोळे यांचे रोपण मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास रोपण करण्यात आले. ताराबाई गावात सामाजिक काम करत असत. त्यांनी चार रुग्णांना जीवदान व दोन रुग्णांना दृष्टिदान देऊन सामाजिक काम करण्याचा वसा मृत्यूनंतरही कायम ठेवला. श्रावण पवार यांच्यासारख्या अशिक्षित व इस्त्री करून उदरनिर्वाह करणार्या सामान्य माणसाने आपल्या पत्नीचे अवयवदान करून समाजात मोठा आदर्श निर्माण केला आहे.