नरडाणा। शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे दि.25 रोजी झालेल्या वादामुळे वीजतार तुटून ती दोन बालकांच्या अंगावर पडल्याने बालके जागीच ठार झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील सेंधवा येथील संतोष पावरा व भरत पावरा यांचे कुटूंब रोजगारानिमित्त वालखेडा येथील किरण अहिरे यांच्या शेतात वास्तव्याला आले होते.
गुरूवारी सायंकाळी परिसरात झालेल्या वादळामुळे पोललगत असलेले एक झाड तुटून ते मुख्य वीजवाहिनीवर कोसळले. त्यामुळे वीजतारा तुटल्या. यावेळी संजय संतोष पावरा (11) व ममता भरत पावरा (9) या दोन बालकांच्या अंगावर ही तुटलेली वीजतार पडल्याने ते जागीच मरण पावले. दरम्यान, या बालकांना उपचारार्थ तातडीने नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. वालखेडा शिवारात वीजेचे पोल जिर्ण झाले असून अनेक ठिकाणी तारा लोंबकळत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करुनही वीज कंपनीचे अधिकारी लक्ष देत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. झाड पडून ज्या पोलवरील वीजवाहक तार तुटली त्या पोलबाबत सरपंच कैलास ठाकरे यांनी या आधीही तक्रार केली होती.