‘तालयात्रेतून’ उलगडला सुरांचा कलाविष्कार

0

पुणे । वेगवेगळ्या तालवाद्यांमधून निर्माण होणारा नाद, सुरेल गायकी आणि या सगळ्याला लाभलेली कथ्थक नृत्यकलेची साथ अशा गायन, वादन, नृत्य या तिन्ही कलांचा संगम असलेल्या परिपूर्ण संगीत संध्येचा रसिकांनी अनुभव घेतला. तालयोगी पं. सुरेश तळवलकर व सहकलाकारांनी सूर, ताल आणि लयीच्या माध्यमातून या तिन्ही कलांचा अप्रतिम कलाप्रवास तालयात्रेतून उलगडला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तालयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात धमार तालातील मृदंग संकीर्तनाने झाली. या तालावर हंसध्वनी रागातील सुमीरन करो गणपती गणेश… या बंदिशीच्या गायन, वादन आणि नृत्याद्वारे केलेल्या सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.

कृष्णाचे वर्णन असलेल्या झपतालातील देस रागातील श्याम छबी अती बनी… या बंदिशीच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. अनिरुद्ध जोशी (सतार), विनय रामदासन्, नागेश आडगावकर (गायन), गोविंद भिलारे, ओंकार दळवी, भागवत चव्हाण, सुजीत लोहर, महेश देशमुख, कृष्णा साळुंखे (मृदंग),आशय कुलकर्णी, सौरभ सनदी, ईशान परांजपे (तबला), क्षितीज सक्सेना (बासरी), रोहित कुलकर्णी (सिंथेसायझर), अभिषेक शिणकर (हार्मोनिअम), उमेश बारभुवन (काहोन), अभिषेक भुरुक (ड्रम्स), अमृता गोगटे, गौरी स्वकुळ आणि सहकलाकार (नृत्य सादरीकरण) यांनी साथ दिली.