उरण : एमएमआरडीए प्रारूप आराखड्याला घेतलेल्या हरकतींच्या सुनावण्या तालुक्यात घेण्यात येतील. तसेच या संबंधीचा कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे पत्र एमएमआरडीएच्या नियोजन विभागाच्या प्रमुख उमा अडुसुमिल्ली यांनी जनतेचा विकास आराखडा मंचाला दिले. त्यामुळे सुनावण्या त्या त्या तालुक्यात घेण्यात याव्यात ही जनतेची मागणी मान्य केली आहे. मुंबई महानगर प्रादेशिक प्रारूप आराखडा 2016- 2036 जाहीर झाल्यानंतर त्याविरोधात रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकती व सूचना नोंदवतानाच या सुनावण्या तालुक्यात घ्याव्यात अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी बेदखल करत सुनावण्या एमएमआरडीएच्या मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलातील कार्यालयात घेण्याचा कार्यक्रम सुरू केला होता.
यासंदर्भात 19 जून रोजी आमदार धैर्यशील पाटील, जनतेचा विकास आराखडा मंचाचे चंद्रशेखर प्रभू, मनवेल तुस्कानो, उल्का महाजन, सुरेखा दळवी, शैलेंद्र कांबळे, रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, संतोष पवार, रुपेश पाटील, विलास गावंड, भावना म्हात्रे आदींसह या तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक संस्थांचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी एमएमआरडीएच्या आयुक्त यु पी एस मदान यांची भेट घेत जनतेच्या भावना मांडल्या होत्या. यावर आयुक्त यु पी एस मदान यांनी लवकरच तसा कार्यक्रम जाहीर करण्याचे अभिवचन दिले होते. सध्या सुरू असलेला सूनावण्यांचा कार्यक्रम आधीच जाहीर झालेला आल्याने तो संपताच स्थानिक वर्तमानपत्रात रीतसर कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र एमएमआरडीएच्या नियोजन विभाग प्रमुख उमा अडुसुमिल्ली यांनी जनतेचा विकास आराखडा मंचाला दिले आहे.