तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय अभिजीत वकृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली

शहादा, दि 2: तालुका एज्युकेशन संस्थेचे संचालक अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय अभिजीत वकृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेत जळगांव येथील रूपाली दिलीप सोनार प्रथम, माजलगाव (जि. बीड) येथील मोहिनी चंद्रशेखर पायघन हिने द्वितीय तर पाली (जि.रायगड)येथील केतन दिनेश गुप्ता याने तृतीय क्रमांक पटकावला.

शहादा तालुका एज्युकेशनल सोसायटी ॲण्ड को-ऑप एज्युकेशन सोसायटी संचलित, आय.एम.आर.डी. महाविद्यालय, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आणि सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालय, शहादा या तीनही वरिष्ठ महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अभिजीत वकृत्व करंडक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

स्पर्धा ही दोन टप्प्यात पार पडली. खुल्या गटासाठी असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून १२९ स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यात ६९ स्पर्धकांनी @२०४७: विकासाच्या दिशा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विद्यार्थी आणि शेती, शेतकरी आणि पाणी या तीन विषयांवर ऑनलाइन पद्धतीने पाच मिनिटांचा आपल्या वकृत्वाचा व्हिडीओ २० सप्टेंबर पर्यंत सादर करुन सहभाग नोंदवला. त्यातून २३ सप्टेंबरला परीक्षणांती दुसऱ्या टप्प्यासाठी त्यातून सर्वोत्कृष्ट १७ स्पर्धकांना ३० सप्टेंबर रोजी महाविद्यालयात ऑफलाईन वक्तृत्व सादरीकरणासाठी निमंत्रित केले होते. ऑनलाईन व्हिडीओंचे परीक्षण प्रा. डॉ. माधव कदम, प्रा.डॉ. उल्हास सोनवणे आणि प्रा.खेमराज पाटील यांनी केले.

ऑफलाईन वक्तृत्व स्पर्धा वरिष्ठ महाविद्यालयाच्या (कै.) पुरुषोत्तम रघुनाथ पटेल सभागृहात पार पडली. स्पर्धेचा उद्घाटनाप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, संस्थेचे व्हा.चेअरमन हिरालाल पाटील, सचिव ए.के. पटेल, महाविद्यालय विकास समिती सदस्या सौ. प्रितीताई पाटील, सिनिअर आर्टस् महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय. जे. पाटील, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप मराठे तसेच आय.एम.आर.डी. महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. यावेळी १७ स्पर्धकांनी आपले वक्तृत्व सादर केले. परीक्षणांती पाच स्पर्धकांना विजेता घोषित केले गेले. या ऑफलाईन स्पर्धेचे परीक्षण प्रा.डॉ. विलास चव्हाण, प्रा. जीवन जगदाळे व श्रीराम दाऊतखाने यांनी केले.

अभिजीत वक्तृत्व करंडक स्पर्धेचे विजेते असे: प्रथम- रुपाली दिलीप सोनार (जळगाव), द्वितीय- मोहिनी चंद्रशेखर पायघन (माजलगाव, जि. बीड), तृतीय- केतन दिनेश गुप्ता (पाली, जि. रायगड), उत्तेजनार्थ प्रथम- अंशिकासिंग देवेंद्रसिंग राजपूत (नंदुरबार), उत्तेजनार्थ द्वितीय- ज्ञानदा तुषार चौधरी (नंदुरबार) या पाचही विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे चेअरमन वनश्री मोतीलाल पाटील यांच्या उपस्थितीत अभिजीत पाटील, सौ. प्रितीताई पाटील, सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेचे समन्वयक आणि सूत्रसंचालक म्हणून प्रा. खेमराज पाटील यांनी काम पहिले.