तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

0

भुसावळ। तालुक्यातील शेतकर्‍यांची स्थिती हालाखीची आहे तसेच येथील बेरोजगारांसाठी फारसे रोजगारही उपलब्ध नाही. त्यातच कोणतीही ठोस उपाययोजना नसतांना गरीब हातमजूर नागरिकांच्या रोजंदारीचे साधन अतिक्रमणाच्या नावाखाली हिरावून घेतले जात आहे, स्ट्रीट वेंडिंग झोनबाबत कारवाई होत नाही, त्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने विकासाच्या बाबतीत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शनिवार, 19 रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी यासंदर्भात पालिका मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

पालिकेच्या सभेत विषय मांडण्याची केली मागणी
उपजिविका संरक्षण आणि विनीमय विधेयकाची अंमलबजावणी करून भुसावळ व वरणगाव नगरपालिका तसेच परिसरात स्ट्रीट वेंडिंग समिती स्थापन करण्याचे आदेश त्वरित द्यावेत तसेच तोपर्यंत अतिक्रमण काढू नये. 22 रोजी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घ्यावा, तसेच उघड्यावरील मांस विक्रीबाबत योग्य कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातून सुशिक्षतांची मोठी फौज दरवर्षी बाहेर पडते. परंतु रोजगाराच्या दृष्टीने शहरातील एमआयडीसीत कुठलीही कंपनी नाही, शासनातर्फे टेक्सटाइल, प्लास्टिक पार्कच्या नावावर युवकांच्या भावनांशी खेळ केला जातोय तो थांबवून सर्व समस्या सुटाव्यात.

या आहेत मागण्या
रोजगाराअभावी युवकांमध्ये नैराश्याची भावना वाढत असल्याने उद्योगांना प्राधान्य द्यावे, दीपनगर व ओझरखेड्याच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी नाही, पालिकेमध्ये सफाई कर्मचारी भरती करावी, अशा विविध समस्या असून अन्यथा तालुका रोजगार व विकासाच्या बाबतीत दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सुपडू भोई, धनराज कोळी, बाळु जंगले, काशीनाथ भोई, राजू परदेशी यांनी परिश्रम घेतले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी प्रा.धीरज पाटील, उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, जेष्ठ शिवसैनिक विलास मुळे, विकास पाटील, गजानन नीळे, प्राचार्य विनोद गायकवाड, सुभाष चौधरी, अजय पाटील, बबलू बर्‍हाटे, निलेश महाजन, सोनी ठाकुर, देवेंद्र पाटील, दत्तु नेमाडे, संजय वानखेडे, संजय फालक, हेमंत चौधरी, विनोद वाणी, उपेंद्र इंगळे, रफीक खान, गुरमिंदर चाहेल, गोकुळ बाविस्कर, अकील शहा, जावेद शहा, सूरज पाटील, हेमंत बर्‍हाटे, छाया पाटील, इंदू कावडे, प्रकाश हिवरकर, मनोज बोंडे, पवन परदेशी, मनोज सोनवणे उपस्थित होते.