चाळीसगाव । उन्हाची तीव्रता वाढत अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या तडाख्यात सापडलेला जीव पाण्यावाचून कासावीस होतो अशा वेळी सामान्य माणसाला तृष्णा भागवण्यासाठी पाणी हवे, असते अशा वेळी जी. एस. टी. तडाख्यात सापडेल्याने पाणी बॉटल देखील 20 रुपयांवर गेली असतांना तहानलेल्या नागरिकांची तृष्णा भागावी म्हणून पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन लगत पाणपोई सुरू करण्यात आली असून या पाणपोईचे उद्घाटन चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नेहमी वर्दळ
शहरात तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेची मोठी वर्दळ असते. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सामन्य माणसाची तृष्णा भागावी म्हणून पाणपोई सुरू करावी, अशी सूचना पत्रकार गणेश पाटील यांनी मांडली त्यास मंगेश शर्मा, रामलाल चौधरी, मोतीलाल अहिरे, संजय सोनार, सुनिल राजपूत, सूर्यकांत कदम, गणेश पवार, अर्जुन परदेशी, देविदास पाटील अशोक महाले यांनी दुजोरा दिला व लागलीच पटापट लागणारी आर्थिक मदत पत्रकारांनी दिली त्यात हॉटेल आर्योपहारचे मालक बन्सीभाऊ जोशी यांची मोलाची साथ मिळाली 4 नवी कोरी रांजण त्यावर घाण पडू नये म्हणून कापड आणि लाकडाच झाकण, नळ आणि त्याबररोबर ग्लास जोडण्यात आली आणि तासाभरात पाणपोई सुरू झाली.
जनतेने मानले आभार
सकाळपासून सायंकाळ पर्यत 2 वेळा रांजण भरण्यात आली अनेकांची तृष्णा पाणपोईने भागवली तर हा चांगला उपक्रम हाती घेतला म्हणून सामन्य जनता पत्रकारांना धन्यवाद देत होती. अशी समाजउपयोगी उपक्रम मराठी पत्रकार परिषद संलग्न जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुका पत्रकार संघ राबवत असते त्यांच्या या उपक्रमाचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे.
अनेक ठिकाणी कोरड
शहरात धनदांडगी लोक आहेत त्यांच्या पूर्वजांच्या नावाने पाणपोई उभारण्यात आल्या मात्र त्यात पाण्याची सोय नाही बसस्थानक, रेल्वे स्टेशन, तहसील समोर अशा निकामी पाणपोई जागा अडवून आहेत त्यांचा उपयोग सामन्य माणसाची तृष्णा भागवण्यासाठी नाही मग ,मोक्याच्या ठिकाणी असलेली ही अतिक्रमणे कशा साठी असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. एकतर या पाणपोई सुरू करा अन्यथा नाव मोठे लक्षण खोटे असलेल्या या पाणपोई नगरपालिका विभागाने काडून टाकाव्या अशी मागणी शहरातून होत आहे.