तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या तीन वर्षापासून आंदोलनांच्या माध्यमातून लढा सुरू

शहादा, ता. २४ : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या तीन वर्षापासून आंदोलनांच्या माध्यमातून लढा सुरू आहे. आंदोलन एका रात्रीतून उभे राहिले नसून सतत तीन वर्षापासून लढा सुरू आहे. आंदोलन करणारे विरोधक नसून सर्वसामान्य नागरिक आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत राज्यकर्त्यांना जाग आली नाही. दुर्दैवाने सारंगखेडा येथील पुलाला पडलेल्या भगदाडानंतर राज्यकर्त्यांना जाग आली आहे. ते विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी वक्तव्य करत असले तरी आम्ही रस्त्यांचा आंदोलनावर ठाम असून येत्या पाच ऑक्टोंबरला नियोजित स्थळी सगळ्यांना सोबत घेऊन आंदोलन होणार म्हणजे होणारच असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत दादा पाटील यांनी स्पष्ट केले.

 

तालुक्यातील शहादा ते शिरपूर, शहादा ते सारंगखेडा व शहादा ते जयनगर या प्रमुख रस्त्यांची पूर्णता वाताहात झाली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे अनेक जण जायबंदी झाले तर काही जिवानिशी गेले. रस्ता दुरुस्त होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या हाल अपेष्टा दूर व्हाव्यात यासाठी गेल्या तीन वर्षापासून शेतकरी संघर्ष समिती, विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. परंतु आज पर्यंत प्रशासनातर्फे केवळ आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कृती करण्यात आली नसल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्वसामान्य नागरिक पाच ऑक्टोबरला होणाऱ्या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनावर ठाम आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आजपर्यंत शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, प्रवासी यांसह असंख्य सर्व सामान्य नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा थोडा देखील अंदाज राज्यकर्त्यांना येत नसल्याने त्यांच्याकडून आंदोलनाबाबत वेगवेगळे वक्तव्य येत असल्याच्या टोला आंदोलकांमार्फत लगावला जातोय.

 

*श्रेय घेण्याचे वक्तव्य दुर्दैवी व चुकीचे…..

आंदोलनाबाबत अभिजीत पाटील म्हणाले की, विविध राजकीय पक्ष, संघटना सर्वसामान्य नागरिक यांना सोबत घेऊन रस्त्यांसाठी तीन वर्षापासून लढा सुरू आहे. हे आंदोलन एका रात्रीतून उभे राहिले नसून गेल्या तीन वर्षांपासून सतत लढा सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या आंदोलनाची दखल स्थानिक आमदार, खासदारांनी घेतली नाही. उलट पक्षी आंदोलनाबाबत त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे व दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे आंदोलन करणारे हे विरोधक नसून सर्वसामान्य नागरिक आहे. राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर आज ही वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली नसती. आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्याने आता अधिकाऱ्यांशीच बोलणे केले जाईल. कोणी कितीही वक्तव्य केले तरी आम्ही आंदोलनावर ठाम असून नियोजित स्थळी व नियोजित वेळी आंदोलन होणारच असल्याची स्पष्टोक्ती श्री पाटील यांनी दिली.

 

स्थानिक राज्यकर्ते अनभिज्ञ ??

दरम्यान, गेल्या तीन वर्षापासून या प्रमुख रस्त्यांची झालेली वाताहत पाहता आजपर्यंत स्थानिक राज्यकर्त्यांना कुठलेही सोयर सुतक नसल्याचेही सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. रस्त्यांची चाळण झाल्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही बोलले जात आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, वाहतूकदार सारेच या रस्त्याने बेजार झाले आहेत. त्याचबरोबर सारंगखेडा येथील पुलाला पडलेल्या भगदाडा नंतर वाहतूक बंद करण्यात आली. या घटनेला आठवडा होत आला परंतु साधी भेट ही स्थानिक राज्यकर्त्यांनी दिली नाही. या घटनांबाबत अद्यापही स्थानिक राज्यकर्ते अनभिज्ञ आहेत का असा खोचक सवालही सर्वसामान्य नागरिकांमधून सोशल मीडियातून अनेक वेळा व्यक्त होत आहे.

 

“तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून विविध राजकीय पक्ष, संघटना, सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यासाठी आंदोलने करीत आहोत. जनतेचे प्रश्न वारंवार रस्त्यावर उतरुन सोडवावे लागत आहे हे मोठे दुर्दैव आहे. आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटावा यासाठी लढत असून राज्यकर्ते मात्र याला श्रेय घेण्याच्या प्रकार म्हणत असतील तर त्यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे व दुर्दैवी आहे. रस्त्यांची झालेली वाताहत पाहता आंदोलनावर ठाम असून आंदोलन होणारच”

अभिजित दादा पाटील (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा)