एरंडोल । तालुक्यातील सोळा गाव पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल थकीत असल्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यामुळे संतप्त झालेल्या सरपंचांनी आज एरंडोल येथील सब स्टेशनला कुलुप लावून ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यान आंदोलनाची दाखल घेवून वीजवितरण कंपनीने सुमारे तिन तासानंतर वीज पुरवठा सुरु केला. मात्र जोपर्यंत अधीक्षक अभियंता येवून आंदोलकांशी चर्चा करीत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत कार्यकर्ते व ग्रामस्थ सब स्टेशन समोर उपस्थित होते. तालुक्यातील आडगाव, कासोदा, तळई, वनकोठा, जवखेडा, अंतुर्ली, आनंदनगर तांडा, फरकांडे या प्रमुख गावांसह अन्य सात गावांची पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी सोळा गाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सदर योजनेचे वीज बिल थकीत झाल्यामुळे वीज वितरण कंपनीने सुमारे दोन महिन्यांपूर्वी वीजपुरवठा खंडित केला होता. वीज पुरवठा खंडित केल्यामुळे सोळाही गावात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होवून ग्रामास्थाना पावसाळ्यातच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते.त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंचानी आज आंदोलनास्त्र वापरले.
चर्चा करून आंदोलन मागे
रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अधीक्षक अभियंता दत्तात्रय बनसोडे व कार्यकारी अभियंता विशाल कुलकर्णी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, रवींद्र जाधव, रवी चौधरी, प्रमोद महाजन व आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात भैय्या राक्षे, रवी चौधरी, रवी पवार, प्रकाश महाजन, धनराज महाजन, शाम कानडे, बाळू महाजन, विकास पाटील, रोहिदास सोनवणे यांचेसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख किशोर निंबाळकर, उपसभापती विवेक पाटील अनिल महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील यांचेसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.