सुर्यकांत कदम चाळीसगाव । चाळीसगाव तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून चाळीसगाव तालुक्यातील 59 गावांचा संभाव्य पाण्याचा कृती आराखडा तयार असून अद्याप पावेतो कुठल्याही गावाला पाणीटंचाईची झळ बसली नसून एकमेव वाघळी ग्रामपंचायतच्या वतीने पाण्याच्या टँकरची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील 13 लघू पाटबंधारे (लपा) तलावांपैकी 6 लपा तलावात फक्त मृत साठा शिल्लक असून ते शुन्य टक्क्यावर आले आहेत. उर्वरित 7 पैकी 4 लपा तलावांची परिस्थिती चांगली असून 3 तलाव मात्र काठावर आहेत. मन्याड धरण 14.95 टक्के असून गिरणा धरणात मात्र समाधानकारक असा 34.67 टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून प्राप्त झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात गेल्या 8 दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. तालुक्यातील 143 गावांपैकी 59 गावांचा संभाव्य पाणी कृती आराखडा ग्रामपंचायतींच्या मागणी नुसार तयार झालास असून या गावांना 210 उपाययोजना प्रस्तावित आहेत. ऑक्टोबर 16 ते जून 2017 पर्यंतचा आराखडा तयार असून त्यात ऑक्टोबर 16 ते डिसेंबर 16 पर्यंत कुठल्याही गावाने पाण्याची मागणी केली नव्हती.
वाघळी गावातून पाणी टँकरची मागणी
जानेवारी 17 ते मार्च 17 पर्यंत 20 गावांची आराखड्यात मागणी होती मात्र मार्च उलटून देखील त्या गावांना पाण्याची आवश्यकता भासली नाही त्यात बाणगाव, बोढरे, चितेगाव, सोनगाव, कृष्णापुरी तांडा, दर्या तांडा, लोणजे, पिंपळवाड म्हाळसा, पिंप्री बु प्रदे, पिंप्री बु प्रचा, सांगवी, वाघळे, रांजणगाव, रामनगर, रोहिणी या गावांना मार्च पर्यंत पाणी टंचाई भासू शकत असल्याने यांचा समावेश करण्यात आला होता मात्र त्यांचे कडून कुठलीही मागणी झालेली नाही. या कृती आराखड्यात बिलाखेड, खेरडे, टाकळी प्रदे, घोडेगाव या 4 गावांना विहीर खोलीकरण मंजूर आहे. तर एप्रिल ते जून 17 पर्यंत संभाव्य पाणीटंचाई असलेल्या ओढरे, बोरखेडे बु, भउर, चांभार्डी खु, दहिवद, देवळी, दरेगाव डामरून, डोणदिगर, जामडी, जुनोने, कलमडू, राजमाने, अभोणे, अभोणे तांडा, करजगाव, कोदगाव, गणपूर, खडकी सिम, खेडगाव, मांदूरने, न्हावे, ढोमणे, कढरे, पिलखोड, पिंपळगाव, पिंपरखेड, गोरखपूर, सायगाव शिंदी, शिरसगाव, उंबरखेड, वडाळा-वडाळी, वरखेडे खु, वाघळी, तळोदे प्रचा, पाथरजे, तामसवाडी, राजदेहरे, या गावांना पाणी टंचाई भासू शकते म्हणून या गावांना संभाव्य पाणी कृती आराखड्यात घेण्यात आले आहे. मात्र अद्याप या गावांकडून पाणी टंचाई नसल्यामुळे कुठलीही मागणी करण्यात आलेली नाही.
वाघळी गावात पाणी टँकरचा प्रस्ताव
एकमेव वाघळी गावाचा पाणी टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. पण कुठल्याही गावाला पाणी टंचाई उद्भवल्यास किंवा प्रति मानसी 20 लिटर पेक्षा कमी पाणी एखाद्या गावात मिळत असेल तर त्या गावाला पाणी टंचाईची उपाय योजना करण्यात येते. त्यानुसार वरील गावे संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यात घेण्यात आल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग पाचोरा यांचेकडून प्राप्त झाली आहे. तशीच परिस्थिती हातपंपांची झाली असून पंचायत समितीतर्फे हातपमाप देखभाल दुरुस्ती पथक कार्यरत झाले आहे. मागणीनुसार हे पथक दुरुस्तीच्या कामाला लागले आहे. तालुक्यातील 13 लपा तलावांमध्ये वाघला 1-36 टक्के, पिंपरखेड-27 टक्के, वाघला 2- 31 टक्के, देवळी भोरस 19 टक्के यामध्ये बर्यापैकी पाणीसाठा असून कृष्णपुरी-11 टक्के, ब्राह्मणशेवगे-5 टक्के, हातगांव 1-8 टक्के, असा काठावर पाणीसाठा उपलब्ध आहे तर उर्वरित 6 लपा तलावांमध्ये मृत साठा वगळता खडकी सिम, पिंप्री, उंबरहोल, कुंजर 2, बोरखेडा, वलठाण व राजदेहरे या लघुपाटबंधारे तलावांमध्ये पाणीसाठा नाहीच.
वीज पंप शेतकर्यांना नोटीसा
या लपा तलावांमध्ये जे शेतकरी लाभ घेत आहेत, त्या सर्व शेतकर्यांना विजेचे पंप काढण्याच्या नोटीस देण्यात आल्या असून त्या कार्य क्षेत्रात असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला संबंधित ठिकाणच्या वीजपंपांचा विद्युत पुरवठा खंडित करावा असे पत्र देण्यात आले आहे तर लपा क्षेत्रातील ज्या ग्रामपंचायती यावर अवलंबून असतील त्या ग्रामपंचायतींना देखील संबंधित मोटारी काढण्याचे पत्र देण्यात आले आहे. गिरणा धरणात समाधान कारक असा 34.67 टक्के तर मन्याड धरणात 14.95टक्के पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती लघु पाझर तलाव लघु पाटबंधारे शाखा चाळीसगाव व पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात अली आहे.