तालुक्यात पाऊस नसतांना तितुर नदीत मात्र पाणी

0

चाळीसगाव । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील जलयुक्त शिवार योजना राज्यभरात मिशन मोडमध्ये राबविले जात आहे. चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेष पाटील यांच्या सक्रिय पुढाकारामुळे पहिल्या 2 टप्प्यातील 65 हुन अधिक गावांमध्ये शासकीय निधी, लोकसहभाग, कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी यामाध्यमातून हजारो कामे पूर्णत्वास आली असून अनेक कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला होता मात्र यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी दिल्याने जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. दमदार आणि नदी-नाले एक करणारा पाऊस नसल्यामुळे जलयुक्त शिवारची कामे देखील कोरडीठाक आहेत.

बंधार्‍याची कामे झाली वर्षभरात
मात्र चाळीसगाव तालुक्यातील तितुर नदी परिसर, कारण आज या नदीवरील 6 सिमेंट बंधार्‍यांमध्ये जवळपास 5 किमी पर्यंत पाणीच पाणी साचले असून भडगाव चाळीसगाव मार्गावरील या पाण्यामुळे डोळ्याचे पारणे फिटत आहे. आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने तितुर नदीवरील बंधार्‍यांसाठी निधी उपलब्ध होऊन वर्षभरातच कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. यामुळे ओझर, पातोंडा, बोरखेडा, वाघळी, हिंगोणे या गावातील हजारो हेक्टर जमिनीला या साचलेल्या पाण्याचा फायदा होत असून विहिरी देखील तुडुंब भरल्या आहेत. मात्र अजूनही चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी व हजारो जलयुक्तची कामे दमदार पावसाची वाट बघत आहेत.