पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत धोकादायक बनली आहे. नेत्ररोग विभागाच्या शस्त्रक्रिया विभागातील छताचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील जवळपास सर्वच विभागांचे स्थलांतर करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील काही भाग पडण्यास सुरुवात झाली आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या एका अहवालानुसार रुग्णालयाची संपूर्ण इमारतच धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नेत्ररोग शस्त्रक्रिया विभाग बंद
नेत्ररोग विभागाच्या शस्त्रक्रिया विभागातील छताचा काही भाग पडल्याने शस्त्रक्रिया विभाग बंद करण्यात आला आहे. या विभागातील मानधन तत्वावरील नेत्ररोग तज्ज्ञांची सेवा समाप्त करण्यात आली होती. क्षेत्रीय कार्यालयाच्या अहवालानंतर रुग्णालयातील काही विभागांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या जुन्या इमारतीलगत असलेल्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
नवीन इमारतीचे बांधकाम होणार
तालेरा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याने सर्व शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु प्रसूतीविषयक कामकाजाकरिता एक शस्त्रक्रिया विभाग स्थलांतरित केलेल्या इमारतीत सुरू ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.