तावडेमियांच्या खात्याला संत ज्ञानेश्वरांचे वावडे!

0

मुंबई । फी भरण्याची ऐपत नसल्यामुळे नोकरी करून ज्या संत ज्ञानेश्वरांच्या नावाच्या विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी घेतली, त्या उपकाराची परतफेड अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या अखत्यारितील खात्यातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात माऊलींचे नाव बदलून केली आहे. अल्पसंख्यांक विकास विभागातील उर्दू अकादमीतर्फे दरवर्षी साहित्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावणाऱ्या साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यातील ‘संत ज्ञानेश्वर पुरस्कारा’चे नाव बदलून तावडे मियांनी आता ‘मिर्झा गालिब जीवन गौरव पुरस्कार’ असे केले आहे. 

कॉंग्रेस सरकारच्याही काळात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने असलेल्या पुरस्काराबाबत छेडछाड केली गेली नव्हती. मात्र गेल्या वर्षी अचानक दोन पुरस्कारांची नावे बदलण्यात आली. बदललेल्या नावांसह नव्या नावाच्या  पुरस्कारांचा ‘जीआर’ही काढण्यात आला. अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या परवानगीशिवाय हा जीआर निघणे शक्य नसल्याने ही नावे बदलण्याबाबत तावडे यांची पूर्ण परवानगी होती, हे उघड आहे. अवर सचिव अनीस शेख यांची या ‘जीआर’वर स्वाक्षरी आहे. मात्र, अल्पसंख्यांक विभागात नेहमीच वादग्रस्त ठरलेले व परस्पर कारभार करणारे कक्ष अधिकारी फारुख पठाण हेच माऊलींच्या नावे पुरस्कार बदलण्यामागे असल्याचे त्यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या अकादमीच्या नऊ सदस्यांचा दावा आहे. कारण त्यांना या पुरस्काराचे नाव बदलल्याचा पत्ताच नव्हता. मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या मार्फत मंत्री विनोदमियां तावडे यांची सही घेण्यात आली असावी. यासंदर्भात तावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या कार्यालयाने ते रविवार असूनही बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले. 

यांच्यापेक्षा कॉंग्रेसवालेच बरे
1995 ते 99 हा काळ वगळता राज्यात कॉंग्रेस प्रणितच सरकारे होती. याकाळात संत ज्ञानेश्वरांचे नाव कुणीही बदलले नाही. मात्र, भाजपच्या मंत्र्यांनी हे नाव बदलले, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. साहीर लुधियानवी पुरस्काराचेही नाव बदलून ते वली दख्खनी पुरस्कार असे करण्यात आले आहे.