बारामती । राष्ट्रवादीचे दोन कट्टर विरोधक रणजित तावरे व रविराज तावरे यांच्यात तब्बल दोन वर्षांनंतर मनोमिलन झाले. यानिमित्ताने गावात नवीन समीकरण तयार झाले असून कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. माळेगाव ग्रामपंचायतीच्या सन 2015 रोजी झालेल्या निवडणुकीत कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांचा रविराज तावरे यांचे बंधू अविनाश तावरे यांनी पराभव केला होता. तेव्हापासून या दोघांत राजकीय संघर्ष सुरू होता. याच राजकीय संघर्षातून रणजित तावरे यांनी रविराज तावरे यांना शह देत जयदीप तावरे यांना सरपंचपदी विराजमान केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार असताना रणजित तावरे व ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांनी विरोधी भूमिका घेतली होती.
दहा सदस्यांचा गट एकत्र आला
सरपंच जयदीप तावरे यांनी दिलेल्या राजीनाम्याला वेगळीच कलाटणी मिळाली असून, रणजित तावरे व रविराज तावरे यांच्या गटाकडे जयदीप तावरे, मोहिणी बनसोडे, अविनाश तावरे, रवींद्र वाघमोडे, राजेंद्र चव्हाण, विजयमाला पैठणकर, वृषाली तावरे, रेखा मोरे, प्रियदर्शनी वाघमोडे, वर्षा पडर असा दहा सदस्यांचा गट एकत्र आला आहे.