ताशी 20 कि.मी.वेगाने झाली तिसर्‍या रेल्वे मार्गाची चाचणी

0

भादली-भुसावळ दरम्यान पहिली चाचणी यशस्वी

भुसावळ- जळगाव-भुसावळदरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनवर ताशी 20 किलोमीटर वेगाने भादली ते भुसावळ दरम्यानच्या नऊ किलोमिटर अंतराच्या रेल्वे रुळांवर इंजिनाची पहिलीच चाचणी शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान यशस्वी झाली. जुलै महिन्यात होणारी ही चाचणी दोन महिने आधी अर्थात मे महिन्याच पूर्ण करण्यात आली असल्याचे भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी ‘दैनिक जनशक्ति’शी बोलतांना सांगितले.

भादली मार्गावरील बहुतांश काम पूर्ण
तिसर्‍या रेल्वे मार्गावरील भुसावळ ते भादली या 12.5 किलोमीटर अंतराचे बहुतांश काम पूर्ण झाले असून नऊ किलोमीटर अंतरावरील लाईनवर सिंग्नल यंत्रणेचेही काम पूर्ण केले असल्याने या मार्गांची पहिली इंजिन चाचणी घेण्यात आली. भादलीपासून काही अंतरापासून ही चाचणी सुरू झाली. तिसर्‍या रेल्वे मार्गावरील नऊ किलोमिटरच्या अंतरात ताशी 20 किलोमिटर वेगाने इंजिन चालवून अधिकार्‍यांनी आनंद व्यक्त केला. तिसर्‍या मार्गावरून गाडी चालविण्यासाठी लागणारी इलेक्ट्रीकच्या 25 हजार होल्ट वायरींगचेही काम हाती घेण्यात आले आहे. ओएचई काम सुरू केले असून एकाच वेळी दोन्ही कामे रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे.

24 किलोमीटर अंतरावर तिसरी व चौथी लाईन
24 किलो मीटर अंतराच्या मार्गावर तिसरी व चौथी लाइन टाकली जात आहे. तिसर्‍या मार्गाचे 12.5 कीलो मीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून जुलै महिन्यात या मार्गावरील सर्व काम अपडेट होणार आहे. या चाचणीवेळी रेल्वेचे उपमुख्य अभियंता (कन्टॅक्शन) रोहित थवरे, कार्यकारी अभियंता राहूल अग्रवाल, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (वर्क्स) आर.के.जैन, सिनिअर सेक्शन इंजिनिअर अनिल चंचल, कनिष्ठ अभियंता दिलीप पाटील, कंत्राटदार पंकज जधवानी आदी उपस्थित होते.