अमळनेर । तालुक्यातील तासखेडे येथे मंगळ ग्रह सेवा संचलित मंगळ ग्रह कृषि संशोधन व सहाय्य समितीतर्फे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच तापीराम पाटील, अमोदेचे माजी सरपंच नामदेव पाटील, अमोदेचे विकासोचे माजी चेअरमन अमृत पाटील, अंतुरलीचे माजी उपसरपंच भास्कर सोनवणे, हिंगोणे विकासोचे सदस्य बाळू पाटील, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव यांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामस्थांतर्फे सरपंच तापीराम पाटील यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांचे स्वागत केले. यावेळी कृषितज्ज्ञ संदीप मोरे यांनी ’सधन लागवड व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
‘स्लाईड शो’च्या माध्यमातून अत्याधुनिक शेतीचा दिला मंत्र
प्रती एकरी सुधारित पद्धतीने झाडांची संख्या वाढविल्यास उत्पादनात हमखास वाढ होते. स्लाईड शो च्या माध्यमातून त्यांनी अत्याधुनिक शेतीचे तंत्र व यंत्र यांची माहिती दिली. कृषी सहाय्यक आर.एच.पवार यांनी पीक विमा म्हणजे काय? त्याचे प्रकार, आवश्यकता, फायदे, पिकनिहाय कशी नुकसान भरपाई मिळते, त्यासाठी शेतकर्यांनी कसे जागरूक राहावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. डिगंबर महाले यांनी मंगळग्रह सेवा संस्था शेतकर्यांसह समाजातील विविध घटकांसाठी कसे सेवाभावी व उपयुक्त कार्य करते आहे, याची माहिती दिली. यावेळी मंगळग्रह संस्थेने प्रसिद्ध केलेल्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांच्या माहिती पत्रकांचेही उपस्थितांना वाटप करण्यात आले. यावेळी तासखेडे विकासो चे चेअरमन नारायण पाटील, माजी सरपंच अशोक पाटील, मुडी येथील पो.पा. नितीन पाटील, शरद पाटील आदींसह तासखेडेसह रंजाणे, अंतुरली, अमोदे परिसरातील शेतकर्यांची मोठी उपस्थिती होती. संस्थेचे कृषीविषयक कार्यक्रमांचे समन्वयक सुबोध पाटील यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे विश्वस्थ दिलीप बहिरम यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बहिरम सर यांनी आभार मानले.