रावेरच्या हॉटेल चालकाकडून मतदान केलेल्या नागरीकांना जेवणात 15 टक्के सूट
रावेर- मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन केले जात असतानाच सर्वसामान्य व्यावसायीकांकडूनही मतदारांना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध ऑफर्स दिल्या जात आहेत. शहरातील हॉटेल चालकाने मतदान करून आलेल्या ग्राहकाला जेवणाच्या बिलात 15 टक्के सुट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘तिकडे दाबा बटन आणि मग येऊन खा मटण’ अशी आगळी-वेगळी योजना रावेरसाठी जाहीर झाली आहे.
हॉटेल चालकाच्या ऑफरची चर्चा
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, 23 रोजी निवडणूक होत आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी रावेर येथील आठवडे बाजारातील हॉटेल धनराजचे मालक कालू बारी यांनी मतदान करून जेवायला येणार्या ग्राहकाला मटणाच्या बिलात 15 टक्के सुट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या ऑफरची खवैय्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.