तिकिटांचा काळाबाजार करणारा अटकेत

0

भुसावळ। रेल्वे आरक्षण तिकिटाचा काळाबाजार करणारा येथील खडका रोडवरील संशयिताला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संशयिताकडून तीन आरक्षित रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. रेल्वे सुरक्षा बलाचे हवालदार योगेश घुले व सहकार्‍यांनी रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ शिव प्रसाद शर्मा (वय 40, रा.खडका रोड, नेमाने कॉलनी, भुसावळ) याला हटकले असता तो गोंधळल्याचे पाहून रेल्वे पोलीसांनी त्याची चौकशी केली. त्याच्याकडे तिकीटे आढळून आली.

स्लीपर क्लासची तीन तिकिटे आढळली
रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ शिव प्रसाद शर्मा याची अधिक चौकशी केली असता भुसावळ-जबलपूर, भुसावळ-नागपूर, भुसावळ-पनवेल अशी स्लीपर क्लासची तीन आरक्षित तिकिटे आढळून आली. सुरक्षा बलाने संशयित शर्मा याला अटक करुन तिकिटे जप्त केली आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.