तिकीटाच्या काळ्या बाजारात दलालास मदत करणार्‍या रेल्वेच्या लिपिकास अटक

Shocking: Jamner Chief Commercial Clerk’s help in black-marketing of railway tickets: Two along with broker arrested by Railway Security Force भुसावळ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करण्यासाठी दलालास मदत करणार्‍या रेल्वेच्या मुख्य वाणिज्य लिपिकास रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचुन अटक केले. जामनेर रेल्वेस्थानकावर ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्य अधिकार्‍यांनी लिपीपासह दलालास अटक केली आहे. यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रकांत प्रताप पाटील (37, रा.नगरदेवळा, ता. पाचोरा) असे पकडल्या गेलेल्या रेल्वेच्या तिकीट खिडकीवरील लिपीकाचे नाव आहे. त्याची नियुक्ती जामनेर रेल्वेस्थानकवर आहे.

सोमवारी रात्री गोपनीयरीत्या कारवाई
पाटील हा अनुकंपा तत्त्वावर नोकरील लागला आहे. तर सिद्धार्थ सुरेश सोनवणे (वय 25, रा. रेल्वे कॉलनी, जामनेर) असे दलालाचे नाव आहे. दरम्यान, जामनेर स्थानकावर रेल्वेचे तिकीट बुकींग काऊंटर सुरू आहे. या ठीकाणी प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट काढायला अनेक अडचणी येत होत्या. वेळेवर कर्मचारी हजर नसणे, आरक्षण तिकीटे उपलब्ध असूनही नकार देणे असे प्रकार वाढले होते. याबाबत काही प्रवाशांनी जळगाव स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाकडे याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा आरपीएफने काही दिवसांपूर्वी केली होती. आरपीएफची पुर्ण खात्री पटल्यावर सोमवारी रात्री भुसावळ आरपीएफचे मंडळ सुरक्षा आयुक्त क्षितीज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, उपनिरीक्षक मनोज सोनी, परीक्षीत वानखेडे, किरण पाटील, विनोद जेठवे यांच्या पथकाने साध्या गणवेशात जाऊन जामनेर रेल्वेस्थानकावर सापळा रचला.

68 हजारांचे रेल्वे तिकीट जप्त
एका कर्मचार्‍याने प्रवासी असल्याचे बनाव करीत आरक्षणाचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दलाल उपलब्ध होतो का? याची चौकशी केली. काही वेळातच त्यांना सिद्धार्थ सोनवणे याने प्रतिसाद देत तिकीट मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी लिपीक चंद्रकांत पाटील यांची मदत सिद्धार्थने घेतली. ही प्रक्रीया पुर्ण होताच आरपीएफ पथकाने चंद्रकांत पाटील याच्या दालनात प्रवेश करुन त्याला रंगेहात पकडले. यावेळी दोघांच्या ताब्यातून 68 हजार 525 रुपये मुल्य असलेले 14 रेल्वे तिकीट मिळून आले. या तिकीटांसाठी संबधित व्यक्तींकडून सिद्धार्थ याने मागणीपत्र तयार केले होते. सापळा यशस्वी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील व सिद्धार्थ सोनवणे या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. आरपीएफ निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील पुढील तपास करीत आहेत.

रात्री 11 वाजता कारवाई
जळगाव आरपीएफ पथकाने सोमवारी 11.5 वाजता कारवाई केली, मात्र पाटील यांची ड्युटीही दुपारी चारपर्यंत असल्याने आरपीएफ हे तेथे चार पर्यत थांबले, नंतर पाच वाजता पाटील व सोनवणे यांना ताब्यात घेऊन जळगाव स्थानकावर आणले, व रात्री गुन्हा दाखल केला. यामुळे तिकीटांचा काळा बाजार करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दोन्ही संशयीतांना कोठडी
आरपीएफने केलेल्या कारवाईतील दोन्ही संशयीत चंद्रकांत पाटील व सिध्दार्थ सोनवणे या दोन्ही जणांना मंगळवारी दुपारी भुसावळ न्यायालयात आणण्यात आले होते, त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची आरपीएफ कोठडी दिली आहे. 1 सप्टेंबरला दोन्ही संशयीतांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे निरीक्षक पाटील यांनी सांगितले.