नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अनेक ज्येष्ठ नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आता ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट नाकारण्यात आले आहे. मात्र पक्षाने तिकीट नाकारल्याचे समजताच मुरली मनोहर जोशींनी संतप्र प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी या संदर्भात कानपूरमधील मतदारांना एक पत्रही लिहिले आहे. ”भारतीय जनता पक्षाचे महासचिव रामलाल यांनी मला कानपूर तसेच अन्य कुठल्याही ठिकाणाहून निवडणूक लढवू नका असे सांगितले आहे.” असे जोशींनी या पत्रात म्हटले आहे.
भाजपाचे महासचिव रामलाल यांनी मुरली मनोहर जोशी यांची भेट घेऊन त्यांना यावेळी तिकीट देण्यात येणार नाही. तसेच आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा तुम्ही पक्ष कार्यालयात येऊन करावी, असे सांगितले. मात्र तिकीट मिळणार नसल्याचे समजताच मुरली मनोहर जोशी संतप्त झाले. जर आम्हाला तिकट न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असेल, तर कमीत कमी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आम्हाला येऊन सांगितले पाहिजे होते. मी पक्ष कार्यालयात येऊन निवडणूक न लढवण्याबाबत घोषणा करणार नाही, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.