तिकीट निरीक्षकांवर होणार्‍या अन्यायाचा काळ्या फिती लावून निषेध

0

भुसावळात निदर्शने ; रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धत्तीविषयी तीव्र नाराजी

भुसावळ- रेल्वे तिकीट तपासणीसांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ देशभरातील रेल्वे स्थानकावरील तिकीट निरीक्षकांसह तिकीट तपासणीसांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला तसेच रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यपद्धत्तीविषयीदेखील नाराजी व्यक्त करण्यात आली. रेल्वे तिकीट तपासणींवर अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची प्रसंगी मागणी करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बलाकडून सापत्न वागणूक
इंडियन रेल्वे तिकीट चेकींग स्टाफ आर्गनायझेशनतर्फे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, 11 मे रोजी मुंबई विभागाचे कर्मचारी धर्मेश कदम यांनी एका विना तिकीट प्रवाशाला येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणल्यानंतर तेथील अधिकार्‍यांनी कारवाई करण्याऐवजी त्याला सोडून दिल्याने धर्मेश कदम यांनी आक्षेप घेतला असता त्या अधिकार्‍याने त्यांनाच मारहाण केली तर दुसर्‍या घटनेत 13 मे रोजी दानापूर विभागाचे कर्मचारी पंकजकुमार यांना गाडी क्रमांक 12392 मध्ये रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचारी फर्स्ट ए.सी. डब्यात अनधिकृतपणे प्रवास करताना आढळून आल्यने आक्षेप घेतला असता त्या कर्मचार्‍याने पंकजकुमार यांना मारहाण करीत बळजबरीने रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणले. त्यानंतर वरीष्ठ अधिकार्‍यांनीही दोषी कर्मचार्‍यावर कारवाई न करता उलट पंकज कुमार यांच्यावर तक्रार न करण्यासाठी दबाव आणला. या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडीओही काढण्यात आला. या घटना बघता रेल्वे सुरक्षा बलात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कुणालाही जुमानात नसल्याचे चित्र दिसत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मंडल सचिव निसार खान यांची स्वाक्षरी आहे.