तिकीट निरीक्षकाची सतर्कता : अल्पवयीन तरुणीला पळवून नेण्याचा डाव फसला

0

कर्मचार्‍याचा डीआएम यांनी केला गौरव ; लखनौतील तरुणीचा कुटुंबाकडे ताबा

भुसावळ- अप लखनऊ-पुष्पक एक्स्प्रेसमधून लखनौतील अल्पवयीन तरुणीला एक तरुण फूस लावून पळवून नेत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने रेल्वेतील तिकीट निरीक्षकाने या युवकाला मनमाड रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात दिल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी घडली. रेल्वे प्रवासात दाखवलेल्या या सतर्कतेची भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी दखल घेत गाडीतील तिकीट निरीक्षक ऋषी कुमार सोनकर यांचा डीआरएम कार्यालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता दोन हजारांची रक्कम बक्षीस म्हणून देत प्रमाणपत्र देवून विशेष गौरव केला. रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रवासात अशीच सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रसंगी यादव यांनी केले.

संशयास्पद हालचालीवरून तरुणाला पकडले
पुष्पक एक्स्प्रेसच्या स्लीपर डब्यातून अल्पवयीन शाळकरी तरुणीसह एक संशयीत तरुण प्रवास करीत असल्याचे व या तरुणाच्या एकूणच हालचाली संशयास्पद असल्याचे वाटल्याने तिकीट निरीक्षक सोनकर यांनी मनमाड रेल्वे स्थानकावर उभयंतांना आरपीएफकडे सोपवले तर या तरुणीने कुटुंबियाचा संपर्क क्रमांक दिल्याने लखनऊस्थित कुटुंबियांशी संपर्क साधल्यानंतर तरुणीचा पालकांना ताबा देण्यात आला. तिकीट निरीक्षकाने दाखवलेल्या सतर्कतेची दखल रेल्वे प्रशासनाने घेत डीआरएम यादव यांनी त्यांचा मंगळवारी सत्कार केला. वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांच्यासह रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.