भुसावळ- डाऊन 12879 भुवनेश्वर एक्स्प्रेसमध्ये सहा वर्षीय मुलीचे तिकीट न काढल्याने तिकीट चेकींग करणार्या पथकाने संबंधित प्रवाशांना दंड भरण्याची सूचना केल्यानंतर प्रवाशांनी दंड भरण्यास विरोध करीत तिकीट निरीक्षकाशी हुज्जत घालत थेट त्यांना मारहाण केल्याची घटना 1 मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकावर घडली होती. या प्रकरणी तिकीट निरीक्षक व इंडियन रेल्वे तिकीट चेकींग स्टाफ ऑर्गनायझेशनचे सचिव निसार अहमद मोईनुद्दीन खान (41, खडका रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार व्यवसायाने ट्रॅव्हल्स चालक असलेले राजेंद्र श्यामसुंदर राऊत (41) व त्यांचा मुलगा सिद्धार्थ राजेंद्र राऊत (19, दोन्ही रा.सांताक्रुंझ कलिना चर्च, 702, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. आरोपींच्या अटकेनंतर रेल्वे न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांचा जामीन फेटाळण्यात आल्याने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, आरोपींनी पुन्हा भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यावर 4 मे रोजी न्या.पी.आर.क्षित्रे यांच्या न्यायासनासमोर सुनावणी होणार होती मात्र न्यायालयाने पुन्हा जामिनासाठी आता 6 मे ही तारीख दिली आहे. आता न्या.एस.पी.डोरले यांच्या न्यायासनापुढे जामिनावर कामकाज होणार आहे. आरोपींतर्फे अॅड.आर.एम.यादव व अॅड.वैशाली साळवे काम पाहत आहेत.