जळगाव। जिल्हा बँकेतील नोटाबदलीच्या घोटाळ्यात सीबीआयने रविवारी आणखी तीन संशयितांची चौकशी केली. जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेचे व्यवस्थापक डी. बी. पाटील व रोखपाल गुजराथी यांची चौकशी करण्यात आली. रविवारी सुभाष चौक अर्बनच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्यात आली. आणखी काही प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता सीबीआय सुत्रांनी वर्तवली आहे. यासाठी 24 दिवसात येऊन गेलेल्या सीबीआय पथकाकडे बर्याच प्रमाणात माहिती आली आहे.
मुंबई येथे संशयितांना बोलविणार
चौकशीसाठी आणखी काही सोसायट्या रडारवर असून सीबीआयकडून त्यांचीदेखील माहिती मागवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सलग तीन दिवस सीबीआय पथकाने जिल्हा बँकेत झालेल्या अपहाराबाबत चौकशी केल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेले सीबीआय पथक अखेर मुंबई येथे काही कागदपत्रासह 26 मार्च रोजी दुपारी रवाना झाले आहे. सीबीआय पथकाने केलेल्या चौकशी दरम्यान बरीच माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पुढच्या काही दिवसांत सीबीआय पथक पुन्हा शहरात दाखल होणार असल्याचे संकेत अधिकार्यांनी दिले आहे. काही संशयितांनादेखील मुंबई सीबीआय सेंटर येथे बोलावण्यात येणार आहे . जिल्ह्यातील काही प्रतिष्ठितांची नावे या घोटाळ्यात समोर येऊ शकतात अशा चर्चेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सीबीआय चौकशीमुळे जिल्हा परिषदेतील संशयीतांचे सरकारी सेवा शर्तीवर प्रतिकुल शेरे नोंदविले जातील का, हा प्रश्नही आज सरकारी कर्मचार्यांमध्ये चर्चेत होता.